मैत्रिणीसाठी काय पण, बहिणीने घरात ठेवलेले भावाचे ६ लाख केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 01:55 PM2023-07-31T13:55:05+5:302023-07-31T13:56:07+5:30
मैत्रिणीला १० लाखांची होती गरज, कुटुंबीयांनी पैश्यांची मदत करण्यास दिला होता नकार
अंबाजोगाई : मैत्रिणीला नोकरीसाठी पैशांची गरज होती. घरच्यांना उसने पैसे मागितले तर देणार नाहीत. म्हणून मैत्रिणीला सोबत घेऊन भावाने कपाटात ठेवलेल्या ६ लाख रुपयांवरच डल्ला मारला. हा चोरीचा प्रकार तब्बल दोन महिन्यांनंतर उघडकीस आला असून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील मोंढा मार्केट परिसरातील रहिवासी सर्वेश विजयकुमार लोहिया यांनी व्यापाराचे ६ लाख रुपये कपाटात ठेवलेले होते. पुणे येथे एका कंपनीमध्ये फॅशन डिझायनर म्हणून नोकरीला असलेली त्यांची बहीण निकिता लोहिया ३१ मे २०२३ रोजी घरी आली होती. दरम्यान, ११ जून रोजी निकिताची मैत्रीण नंदिनी बॅनर्जी निकिताला भेटण्यासाठी अंबाजोगाईत आली. नंदिनीला नोकरीची ऑर्डर आल्यामुळे तिला १० लाख रुपयांची गरज होती. निकिताने ही बाब कुटुंबीयांना सांगितली होती.
परंतु कुटुंबीयांनी निकिताला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे निकिताने मैत्रीण नंदिनीला सोबत घेत भावाने कपाटात ठेवलेले ६ लाख रुपये चोरले. त्यानंतर त्या दोघीही पुण्याला निघून गेल्या. दोन महिन्यानंतर लोहिया यांना कपाटात ठेवलेले पैसे सापडत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सर्वेश लोहिया यांनी बहीण निकिता व तिची मैत्रीण नंदिनी या दोघींविरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विनोद घोळवे करीत आहेत.