अशी ही बनवाबनवी! विकलेले वाहन चोरले अन् पुन्हा दुसऱ्यास विकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 07:57 PM2022-10-18T19:57:47+5:302022-10-18T19:58:18+5:30
चोरी गेलेल्या वाहनाचा शोध घेत असताना वाहन मूळ मालकाकडे असल्याचे समजले
वाळूज महानगर (औरंगाबाद) : विक्री केलेले वाहन चोरी करून दुसऱ्याला विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अजीम शेख नजीम (रा. जिकठाण) याने चार वर्षांपूर्वी गावातील जावेद मन्सूर शेख याच्याकडून टाटा एलपीटी वाहन (क्र. एमएच ०६-एक्यू ६०३३) हे ६५ हजार रुपयांत खरेदी केले होते. या वाहनावर जावेद शेख याने एचडीबी या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. वाहन विक्री करण्यापूर्वी या कर्जाचे हप्ते शेख अजीम हे भरणार असल्याने तसेच कर्जाची परतफेड केल्यानंतर हे वाहन शेख अजीम यांच्या नावावर करण्याचा करारनामा करण्यात आला होता. यानंतर शेख अजीम यांनी कर्जाचे हप्तेही भरले. अशातच २० सप्टेंबरला हे वाहन चोरीस गेले.
शोध घेत असताना शेख अजीम यांनी हे वाहन मूळ मालक जावेद शेख याच्याकडे असल्याचे समजल्यानंतर त्यांनी जावेद याच्याकडे जाऊन वाहन परत देण्याची मागणी केली. मात्र, जावेदने हे वाहन लियाकत हमीद शेख (रा. घोडेगाव, ता. गंगापूर) यास विक्री केल्याचे शेख अजीम यांना समजले. शेख अजीम यांनी पोलीस आयुक्तालयात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर जावेद शेख व लियाकत शेख या दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.