वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा काशीद समुद्रात बुडाला; सहलीतील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:40 PM2023-01-10T12:40:13+5:302023-01-10T12:46:11+5:30

तीन जणांना वाचविण्यात यश : औरंगाबादच्या कन्नड येथील सहल, रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्रातील दुर्घटना

The son drowned in the sea under his father's eyes; Two students from Kannad who went on a trip drowned in Kashid beach | वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा काशीद समुद्रात बुडाला; सहलीतील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा काशीद समुद्रात बुडाला; सहलीतील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

googlenewsNext

कन्नड/अलिबाग : कन्नड शहरातील साने गुरुजी शाळेतून गेलेल्या सहलीतील पाचजण रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्रात बुडाले. त्यातील तीन जणांना वाचविण्यात यश आले; मात्र दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. प्रणव सजन कदम (वय १५) व रोहन बेडवाल (वय १५) अशी मयत मुलांची नावे आहेत.

शहरातील साने गुरुजी शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या ४१ मुली व ३९ मुलांचा समावेश असलेली सहल कन्नड आगाराच्या दोन बसने शुक्रवारी (दि. ६) रात्री ८ वाजता मोरगाव, जेजुरी, लोणावळा, खंडाळा, प्रतापगड, रायगड, मुरुड जंजीरा, काशिद, पाली या मार्गासाठी गेली होती. मुरुड जंजिरा पर्यटनस्थळ पाहून ही सहल सोमवारी दुपारी काशिद येथे आली. यावेळी विद्यार्थी खेळण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले. अचानक आलेल्या लाटेत प्रणव सजन कदम, रोहन बेडवाल, कृष्णा विजय पाटील (वय १५), तुषार हरिभाऊ वाघ (वय १५) व रोहन दिलीप महाजन (वय १५) हे पाच विद्यार्थी पाण्यात बुडाले. हे लक्षात येताच एकच गोंधळ उडाला.

यावेळी मुख्याध्यापक धैर्यशील केरे व जीव रक्षकांनी धाव घेऊन यातील तीन जणांना बाहेर काढले. मात्र, प्रणव कदम व रोहन बेडवाल हे पाण्यात दूरवर जाऊन दिसेनासे झाले. थोड्याच वेळात प्रणवचा मृतदेह सापडला, तर तासाभराच्या शोधानंतर रोहन बेडवाल याचा मृतदेह सापडला. नाका तोंडात पाणी गेल्याने जखमी झालेल्या कृष्णा पाटील, तुषार वाघ व रोहन महाजन यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना पाहून सायली मनोज राठोड (वय १५) या विद्यार्थिनीला धक्का बसल्याने तिलाही रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेमुळे सहलीतील मुले-मुली भेदरले होते. तर शिक्षकही तणावाखाली होते. काशिदवरून पालीच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर सहल परत फिरणार होती. तत्पूर्वीच ही दुर्घटना घडल्याने शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतातुर झाले होते. प्रत्येकजण आपला मुलगा सुरक्षित आहे का याची चौकशी करीत होते.

मयत प्रणवचे वडीलही होते सोबत
समुद्रात बुडून मयत झालेल्या प्रणव कदमचे वडील सजन कदम हे साने गुरुजी शाळेत शिपाई आहेत. प्रणव हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. या विद्यार्थ्यांबरोबर ते सुद्धा या सहलीबरोबर गेलेले होते. डोळ्यादेखत मुलगा बुडाल्याने त्यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. प्रणवच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे, तर मयत रोहन बेडवाल याचे वडील शेतकरी असून, त्याच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ आहे.

विद्यार्थ्यांना नाश्ताही दिला नव्हता
मुरुड येथून काशीद समुद्रावर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पर्यटनास आणले. मात्र, या विद्यार्थ्यांना नाश्ताही दिला नव्हता, अशी माहितीही समोर आली आहे. घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणले असता, विद्यार्थी भुकेले असल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते.

Web Title: The son drowned in the sea under his father's eyes; Two students from Kannad who went on a trip drowned in Kashid beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.