आईचा सांभाळ न करणाऱ्या बापाचा मुलाने केला खून; वेरूळ येथील घटनेचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2024 07:45 PM2024-12-07T19:45:32+5:302024-12-07T19:45:54+5:30
पोलिस चौकशीत आरोपीने दिली कबुली
खुलताबाद : कुटुंबियांचा सांभाळ करत नसल्याच्या कारणावरून तालुक्यातील तिसगाव तांडा येथील एका व्यक्तीचा त्याच्या मुलाने गळा आवळून खून केल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी मंगळवारी खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली. शांतीलाल कोमा राठोड (५०, रा. तिसगाव तांडा) असे मृताचे नाव असून मुलगा धीरज (२७, रा. गिरनेरतांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) हा आरोपी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर-धुळे महामार्गावरील वेरूळ येथील उड्डाणपुलाखाली शांतीलाल कोमा राठोड यांचा मृतदेह २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आढळला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेला. त्यानंतर खुलताबाद ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, धीरज हा वडिलाच्या अंत्यविधीला आला असता पोलिसांना त्याच्याविषयी संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी पोलिसांनी धीरजला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. याप्रकरणी चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने पित्याचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यास बुधवारी खुलताबाद येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
बाप राहत होता कुटुंबापासून वेगळा
मृत शांतीलाल राठोड यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. शांतीलाल यांचे काही कारणावरून पत्नी व मुलासोबत पटत नव्हते. त्यामुळे शांतीलाल हे तिसगाव तांडा येथे एकटे राहत होते. तर मुलगा धीरज व त्याची आई गिरनेर तांडा येथे राहत होते. बाप आईसह मुलाला सांभाळत नसल्याने धीरजला बापाविषयी मनात चीड येत होती. यावरून बापाचा गळा आवळून खून केल्याची कबुली धीरजने पाेलिसांना दिली.