सिल्लोडमध्ये 'जय शिवराय'चा नाद दुमदुमला; प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 07:19 PM2022-02-18T19:19:19+5:302022-02-18T19:20:04+5:30
शहरातील प्रमुख भागातून पुतळ्याची काढण्यात आली मिरवणूक.
सिल्लोड : शहरातील मुख्य रस्त्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळ्याची आज दुपारी स्थापन करण्यात आली. तत्पूर्वी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.
सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघालेली मिरवणूक शिवाजी नगर, सराफा मार्केट, श्री. म्हसोबा गल्ली व मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापर्यंत आली. मिरवणुकीत नागरिकांनी सहभाग नोंदवत आनंदोत्सव साजरा केला. शहरातील मिरवणूक मार्ग सडा रांगोळीसह फुलांनी सजविण्यात आला होता. विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आकर्षक फुलांच्या माळांनी सजविण्यात आलेल्या वाहनातून पुतळा प्रवेशद्वारावर आणण्यात आला. मिरवणुकीत पुष्पांची मुक्त उधळण, ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी, डीजे यासह जय भवानी, जय शिवाजींच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते.
मिरवणुकीत शहरवासियांसह देविदास लोखंडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, केशवराव तायडे, डॉ. कल्पना जामकर, काकासाहेब राकडे, नंदकिशोर सहारे, संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे,सतीष ताठे, डॉ. मॅचिंद्र पाखरे,मारुती वराडे,शेख इम्रान ( गुड्डू ),सुदर्शन अग्रवाल,रईस मुजावर,आसिफ बागवान, रुउफ बागवान आदींचा सहभाग होता.