घुंगराचा आवाज ऐकून रसवंतीगृहावर थांबलात; रस पिण्याआधी बर्फ पहा, तपासणी होते का?
By साहेबराव हिवराळे | Published: March 7, 2024 01:39 PM2024-03-07T13:39:26+5:302024-03-07T13:39:43+5:30
जो बर्फ वापरता, तो शुद्ध की अशुद्ध पाण्यात तयार झाला आहे, हे अन्न व औषधी प्रशासन तपासणी केल्यावर सांगू शकते.
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा जाणवत असल्याने रसवंतीगृहांची संख्या वाढू लागली आहे. यासाठी रीतसर परवानगी व वापरला जाणारा बर्फ आरोग्यासाठी किती चांगल्या पाण्यात तयार झालेला आहे का, याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने यंदा केलेली नाही. परंतु आता उन्हाळा सुरू झाल्याने याविषयी एक मोहीम चालविली जाणार आहे. शीतपेय आणि आईस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटरसह रसवंतीसाठी वापरला जाणारा बर्फ तपासण्यात येणार आहे.
मोजक्याच रसवंत्यांची नोंद
मनपा प्रशासनाकडे काही रसवंतीचालकांनी नोंदी केल्या नाहीत. यासाठी वीज मीटर तसेच इतरही परवानग्या लागतात. शंभरच्या जवळपासही रसवंत्या सुरू झालेल्या दिसत नाहीत.
एका रसवंतीला रोज किती लागतो बर्फ?
ज्या रसवंतीत ग्राहक साधारण येत असतील, त्या ठिकाणी अर्धी लादी लागते, परंतु ताजा उसाचा रस आणि तो अद्रक, लिंबू टाकून देत असेल तर त्या ठिकाणी कुटुंबासह नागरिक येतात. अशा ठिकाणी जादा बर्फ लागतो.
हा बर्फ चांगल्या पाण्यात तयार होतो का?
उन्हाळ्यात प्रत्येकाला बर्फ हवाहवासा वाटतो. विना बर्फाचा रस बहुतांश नागरिक टाळतात. परंतु जो बर्फ वापरता, तो शुद्ध की अशुद्ध पाण्यात तयार झाला आहे, हे अन्न व औषधी प्रशासन तपासणी केल्यावर सांगू शकते.
एकाही रसवंतीची तपासणी नाही
आताच उन्हाळा सुरू झाला असून, शीतपेय व आईस्क्रीम रसवंतीची दुकाने तपासणी मोहीम अद्याप सुरू झालेली नाही. ती आता सुरू होईल. यंदा शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी रसवंत्या उभारण्याचे काम सुरू असून, आरोग्याच्या दृष्टीने उन्हाळ्यात ज्यूस सेंटर तसेच उसाच्या रसात कोणता बर्फ वापरला जातो, हे रसवंतीत जाऊन टीम तपासणार आहे.
- अर्जुन भुजबळ, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन