मराठवाड्यातील रेल्वेचा आवाज हरपला; रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मांचे निधन
By संतोष हिरेमठ | Published: September 25, 2022 11:36 AM2022-09-25T11:36:58+5:302022-09-25T11:37:51+5:30
मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसाठी ओमप्रकाश वर्मा सातत्याने प्रयत्न पाठपुरावा करीत होते.
औरंगाबाद: मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटणारे मराठवाडारेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने मराठवाड्याचा रेल्वेचा आवाज शांत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसाठी ओमप्रकाश वर्मा सातत्याने प्रयत्न पाठपुरावा करीत होते. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरणासह पीटलाईन, नवीन रेल्वे गाड्या आदी प्रश्नांसाठी ते सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असे. त्यांच्या प्रयत्नामुळेच अनेक प्रश्न मार्गी लागू शकले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे ओमप्रकाश वर्मा यांना पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
स्वतःच्या पेन्शनचे पैसे रेल्वे प्रश्नांवर खर्च
ओमप्रकाश वर्मा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रेल्वे प्रश्नांसाठी दिले. ते स्वतःच्या पेन्शनचे पैसे खर्च करून रेल्वेमंत्री, रेल्वे अधिकाऱ्यांकडे जात. इतक्या वर्षांपासून मराठवाड्याला न्याय मिळत नाही, असे वर्मा म्हणत. मराठवाड्यातील रेल्वेच्या विकासासाठी संपूर्ण आयुष्य देणाऱ्या ओमप्रकाश वर्मा यांच्या निधनाने मराठवाड्याची मोठी हानी झाली आहे.