मराठवाड्यात ७ वर्षांनंतर होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक
By विकास राऊत | Published: August 24, 2023 12:26 PM2023-08-24T12:26:04+5:302023-08-24T12:26:27+5:30
१५ वर्षांत दोन बैठका, मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष समाप्तीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ७ वर्षांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील प्रलंबित व नवीन योजनांच्या आढाव्यासह टंचाईसदृश परिस्थिती आणि मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष समाप्तीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ७ वर्षांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. १६ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. याबाबत शासनाकडून यासाठी तोंडी निराेप आला असून, आठवड्याच्या अखेरीस नियोजनाचे पत्र येणे अपेक्षित आहे.
४ ऑक्टोबर २०१६ रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात झाली होती. ५० हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम विभागासाठी आखण्यात आला होता. त्याचे काय झाले, किती प्रकल्प मार्गी लागले, अनुदान किती मिळाले, या सगळ्या बाबींची माहिती विभागीय आयुक्तालयाने पूर्ण विभागाकडून मागविण्यास सुरुवात केली आहे.
कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणीअभावी ‘कालबाह्य’ ठरल्याची टीका झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी जाहीर केलेल्या सुमारे ५० हजार कोटींच्या कार्यक्रमांपैकी बहुतांश योजनांना गती मिळाली नाही. मराठवाड्यातील सिंचन अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून तत्कालीन सरकारने सुमारे दहा हजार कोटींसह रस्ते विकास, कृषी, पायाभूत सुविधांसह औद्योगीकरणास चालना देणाऱ्या योजना सात वर्षांत बाळसे धरू शकल्या नाहीत.
१५ वर्षांत झाल्या फक्त दोन बैठका...
१५ वर्षांत मंत्रिमंडळाच्या फक्त दोन बैठका झाल्या. २००८ साली स्व. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात बैठक झाली होती. यानंतर २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर निम्न दुधना आणि नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला. परंतु इतर प्रकल्पांना तरतुदीच्या तुलनेत अत्यल्प निधी मिळाल्याने ती कामे अजूनही सुरूच आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीबाबत तोंडी सूचना आल्या आहेत. लेखी सूचना येतीलच. विभागीय प्रशासनाने पूर्ण जिल्हा व विभागनिहाय प्रकल्प, योजनांची माहिती घेण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री १७ सप्टेंबर येणार आहेत.
- मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त