विद्यापीठाला राज्य शासनानेच दिला वित्त व लेखाधिकारी
By राम शिनगारे | Published: August 18, 2023 07:58 PM2023-08-18T19:58:40+5:302023-08-18T20:00:03+5:30
राज्य शासनाकडून तिसऱ्यांदा नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राज्य शासनाने तिसऱ्यांदा वित्त व लेखाधिकारी दिला आहे. वित्त विभागाकडे अधिकारी देण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनाने केली होती. त्यानुसार सविता जंपावाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या विषयीचा शासन आदेश नुकताच निघाला.
विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात प्रभारी वित्त व लेखाधिकाऱ्यांनी कारनामे केल्यानंतर त्यांनी राज्य शासनाकडेच वित्त व लेखाधिकारी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच शंकर चव्हाण हे वित्त व लेखाधिकारी दिले. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यांमध्येच ते निवृत्त झाले. त्यानंतर राज्य शासनाने राजेंद्र मडके यांची नियुक्ती विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी म्हणून केली होती. त्यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ विद्यापीठात सेवा दिली. त्यांच्या बदलीनंतर विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदाचा पदभार प्रभारींकडेच होता.
विद्यापीठ प्रशासनाने नुकताच राज्य शासनाशी पत्रव्यवहार करत अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. त्यानुसार वित्त विभागाने राज्यभरातील ५५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये विद्यापीठात सविता बाबुराव जंपावाड यांची वित्त व लेखाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. येत्या तीन-चार दिवसात त्या पदभार स्वीकारतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.