विमान तिकिटाचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना साडेदहा लाखांना फसवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:06 PM2022-03-31T20:06:06+5:302022-03-31T20:06:51+5:30
न्यायालयाच्या आदेशाने नाशिकमधील ट्रॅव्हल्स एजन्सीवर गुन्हा दाखल
औरंगाबाद : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विमानाने पाठविण्यासाठीचे बुकिंग ऐनवेळी रद्द करून व्यावसायिकाला दहा लाख ५० हजार ३४ रुपयांना फसविणाऱ्या टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयाने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते.
अविनाश पाहवा, दिनेश ढापणे (दोघेही रा. संकलेचा गार्डन कंट्री, नाशिक) अशी फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीच्या मालकांची नावे आहेत. सिडको पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार व्यावसायिक केरान मोहनदास वैष्णव (४२, रा. आविष्कार कॉलनी, सिडको) हे अनेक वर्षांपासून उच्च शिक्षणासाठी विदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतरांच्या तिकिटाची बुकिंग करतात. त्यांनी २० जून २०१९ रोजी जर्मनीसाठी २०, तर रशियामध्ये येण्या व जाण्यासाठी सात विद्यार्थ्यांची बुकिंग अविनाश पाहवा आणि दिनेश ढापणेच्या दिनेश टुर्स ॲॅण्ड ट्रॅव्हल्सच्या वतीने केली होती. २१ जुलै रोजी २०१९ नंतर दोन दिवसांनी एकूण २७ विद्यार्थ्यांना विदेशी जायचे होते. तत्पूर्वी पाहवा आणि ढापणे यांनी ऐनवेळी दहा लाख ५० हजार ३५४ रुपये घेऊन केलेल्या विमानाच्या तिकिटांची बुकिंग रद्द केली.
तसेच विद्यार्थी परदेशातून परत येण्याच्या दोन दिवस आधी बुकिंग रद्द केले. या दोन्ही वेळी वैष्णव यांना अधिकचे पैसे देऊन विद्यार्थ्यांच्या विमान प्रवासाचे बुकिंग करावे लागले. तसेच पाहवा आणि ढापणे यांनी सुरुवातीच्या बुकिंगसाठी दिलेले पैसे परत देण्यास वैष्णव यांना नकार दिला. फसवणूक झाल्याचे दिसताच वैष्णव यांनी सिडको पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे वैष्णव यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करत आहेत.