प्रेमविवाह केलेल्या युवकाची आत्महत्या; सासर-माहेरपासून दुरावलेल्या तिचे काय होणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:59 PM2022-06-28T12:59:12+5:302022-06-28T13:00:01+5:30
वाढत्या कर्जाने तणावाखाली असलेला तरुण पत्नीला आपण सोबत आत्महत्या करू, असे नेहमी म्हणायचा.
औरंगाबाद : प्रेमविवाह केलेल्या युवकाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे प्रेमकहाणीचा दु:खद अंत झाला. ही घटना संजयनगर भागात घडली. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शुभम केशवराव घुगे (२६, रा. लिंबाळा, ता. जिंतूर, जि. परभणी ह.मु. संजयनगर गल्ली नंबर ३) असे मृत युवकाचे नाव आहे. शुभम पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्याचे अभियांत्रिकीचा डिप्लोमा करीत असलेल्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांचे धर्म वेगळे असल्यामुळे दोन्ही कुटुंबांचा विरोध होता. मुलीला १८ वर्षे पूर्ण होण्यास दोन महिने कमी असल्यामुळे त्याच्या विरोधात पुण्यातील एका ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याने औरंगाबादेत २०१७ साली आर्य समाज पद्धतीने विवाह केला. त्यास एका मोठ्या ज्वेलरीच्या दुकानात नोकरीही लागली होती.
कोरोनाच्या काळात ही नोकरी गेली. तीन वर्षांपासून तो संजयनगरमध्ये राहत होता. गावाकडे येऊ देत नसल्यामुळे मित्रांकडून उसने पैसे घेऊन कसेतरी दोघे दिवस काढत होते. यातून त्याला प्रचंड निराशा आली होती. रविवारी दुपारी पत्नी झोपेत असताना त्याने घरातच गळफास घेतला. पत्नी उठल्यानंतर शुभमने गळफास घेतल्याचे तिला दिसले. पोलिसांना कळविण्यात आले. घाटीत नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार ध्रुवराज गोर्डे करीत आहेत.
तिचे काय होणार?
वाढत्या कर्जाने शुभम तणावाखाली होता. पत्नी शुभांगीला तो आपण सोबत आत्महत्या करू, असे नेहमी म्हणायचा. मात्र पत्नी त्याला धीर देत होती. हे दिवस निघून जातील, असे ती त्याला वारंवार सांगायची. मात्र शुभमनेच आत्महत्या करीत धीर सोडला. आता शुभांगीचा पतीच राहिला नसल्यामुळे तिला सासर आणि माहेरचे नातेवाईक स्वीकारणार का, हा प्रश्न आहे.