मैत्रिणीच्या हत्येचा संशय असलेल्या तरुणाची आत्महत्या; तरुणीच्या निर्घृण हत्येचे गूढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:04 PM2022-05-21T18:04:24+5:302022-05-21T18:05:21+5:30
मांडकी शिवारातील लिंबाच्या झाडाला घेतला गळफास घेऊन केली आत्महत्या
औरंगाबाद : नारेगावातील राजेंद्रनगर येथे १८ मे रोजी सायंकाळी झालेल्या तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या तिच्या मित्राने मांडकी शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी २० मे रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शंकर विष्णू हगवणे (२४, मूळ रा. येवता बंदी, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) असे मृताचे नाव आहे. ब्रिजवाडी येथील रेणुका देवीदास ढेपे (१९) या तरुणीचा नारेगावातील राजेंद्रनगर येथे १८ मे रोजी सायंकाळी शंकरच्या खोलीत निर्घृण खून झाल्याची बाब समोर आली. शंकर आणि रेणुका हे चांगले मित्र होते. शिवाय घटनेच्या दिवशी दुपारपासून दोघेही खोलीमध्ये एकत्र होते. रेणुकाचा खून झाल्यापासून शंकर गायब झाला होता. यामुळे पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून शंकरचा शोध सुरू केला होता. घटनेपासून त्याचा मोबाइलही बंद होता. पोलिसांचे पथक त्याला शोधण्यासाठी त्याच्या गावी गेले होते. मात्र, तेथे तो सापडला नव्हता. शंकर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा. त्याचा चुलतभाऊही नारेगावमध्ये राहत आहे. यामुळे पोलिसांनी त्याच्याकडेही विचारपूस केली. परंतु, त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मांडकी शिवारातील बन्सीधर झिंजुर्डे यांना त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. ही बाब त्यांनी चिकलठाणा पोलिसांना कळविली. याविषयी माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली तेव्हा हे प्रेत शंकर हगवणेचे असल्याचे समजले. या घटनेची माहिती त्याचा चुलतभाऊ प्रदीप यांना कळविली. प्रदीपही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने ते प्रेत शंकरचेच असल्याचे पोलिसांना सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविले. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार रवींद्र साळवे या घटनेचा तपास करीत आहेत.
पोलिसांकडून खुनाच्या घटनेचा तपास सुरू
खुनाच्या घटनेतील मुख्य संशयित म्हणून शंकरचा पोलीस शोध घेत होते. मात्र, त्याने आत्महत्या केल्याने पोलिसांना धक्काच बसला. असे असले तरी या खुनाच्या घटनेचा तपास पोलीस सुरूच ठेवणार आहेत. मृत शंकरचा मोबाईलही पोलिसांना अद्याप सापडला नाही.