शस्त्रक्रिया अंडकोशाची, पण चिमुकल्याच्या जांघेत सुई सापडल्याने डाॅक्टर थक्क
By संतोष हिरेमठ | Published: May 20, 2024 02:46 PM2024-05-20T14:46:02+5:302024-05-20T15:28:48+5:30
२ वर्षांच्या मुलाची वेदनेतून मुक्तता, पण सुई तिथे गेली कशी ? जाणूनबुजून टोचल्याची शक्यता ?
छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांच्या मुलाचा उजवा अंडकोश पोटात होता. यावर शस्त्रक्रिया करताना डाॅक्टरांना जांघेत ३ सें.मी. लांबीची सुई असल्याचे आढळले. शस्त्रक्रियेबरोबर डाॅक्टरांनी जांघेत अडकलेली सुई काढून मुलाची वेदनेतून मुक्तता केली.
या मुलाचा उजवा अंडकोश पोटात होता. यामुळे गंभीर परिस्थिती होती. यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यानुसार ते शस्त्रक्रियेसाठी चिमुकल्याला घेऊन शहरातील तोतला हाॅस्पिटलमध्ये दाखल झाले. याठिकाणी मुलावर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. वरिष्ठ पेडियाट्रिक सर्जन डाॅ. आर. जे. तोतला, वरिष्ठ मूत्ररोगतज्ज्ञ डाॅ. मार्तंड पाटील, पेडियाट्रिक भूलतज्ज्ञ डाॅ. श्रीगोपाल भट्टड यांनी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान मुलाच्या जांघेत काही तरी तीक्ष्ण वस्तू असल्याचे डाॅक्टरांना जाणवले. तपासणीअंती मज्जातंतूच्या खोलवर सुमारे ३ सें.मी. लांबीची सुई असल्याचे स्पष्ट असल्याचे स्पष्ट झाले. डाॅक्टरांनी तातडीने ही सुई काढली.
शिलाई मशीनची सुई
मुलाच्या शरीरातून काढलेली सुई ही शिलाई मशीनची आहे. तीही गंजलेली होती, असे डाॅक्टरांनी सांगितले. दोन वर्षांच्या मुलाच्या जांघेत सापडलेली सुई पाहून आम्हीही थक्क झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
जाणूनबुजून टोचली?
मुलाला कोणीतरी जाणूनबुजून ही सुई टोचल्याची शक्यता वर्तविण्यात आली. मात्र, त्यासंदर्भात कुटुंबीयांना कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे सुई शरीरात गेली कशी, हा प्रश्न अनुत्तरित राहिला.
वयाच्या दीड महिन्यापासून त्रास
मुलगा दीड महिन्याचा असल्यापासून त्याला विशिष्ट स्थितीत त्रास होत होता. त्यामुळे मुलाला काही तरी त्रास होत असल्याची, शरीरात काही तरी असल्याचे वाटत असल्याचे मुलाच्या आईने डाॅक्टरांना सांगितले.
पालकांनी काळजी घ्यावी
शरीरातील संवेदनशील अशा जागेत धारदार सुई अनेक दिवस असूनही मुलाला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. ‘जाको राखे साईयां मार सके ना कोई’ असेच म्हणावे लागेल. असा प्रकार टाळण्यासाठी पालकांनी मुलांची अधिक काळजी घेतली पाहिजे.
- डाॅ. आर. जे. तोतला, वरिष्ठ पेडियाट्रिक सर्जन