शहरातील बड्या हॉटेल्सच्या नळ कनेक्शनची होणार तपासणी; प्रभारी प्रशासक चव्हाण यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:33 PM2022-06-13T19:33:55+5:302022-06-13T19:34:16+5:30

जायकवाडी धरणातून १३५ ते १४० एमएलडी इतका पाणीउपसा होतो.

The tap connections of big hotels in the city will be inspected; Order of Administrator in charge Chavan | शहरातील बड्या हॉटेल्सच्या नळ कनेक्शनची होणार तपासणी; प्रभारी प्रशासक चव्हाण यांचे आदेश

शहरातील बड्या हॉटेल्सच्या नळ कनेक्शनची होणार तपासणी; प्रभारी प्रशासक चव्हाण यांचे आदेश

googlenewsNext

औरंगाबाद : जायकवाडी ते नक्षत्रवाडी व तेथून पुढे शहरात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून ज्यांना नळजोडण्या दिल्या आहेत, अशा सुमारे एक ते दीड हजार नळधारकांना वॉटरमीटर बसविण्यात येणार असल्याचे प्रभारी महापालिका प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी सांगितले.

महापालिकेचे नियमित प्रशासक रजेवर गेल्यामुळे चव्हाण यांच्याकडे पदभार आहे. त्यांनी पाणीपुरवठ्यातील अडचणी, उपाययोजना, टँकरने होणारा पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण याबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, मुख्य जलवाहिनीवरून १० ते १२ तास पाणीपुरवठा सुरू असतो. या जलवाहिनीवरून ज्यांनी नळ घेतलेले आहेत, त्यांना मीटर बसविण्यात येईल. जेवढे पाणी वापरतील, तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतील. तसेच मोठ्या हॉटेलधारकांच्या नळ कनेक्शनची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या ५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे, त्यात बदल करण्याबाबत रविवारी चर्चा केली. शहराची पाण्याची गरज २०० एमएलडीच्या पुढे आहे.

मुख्य जलवाहिनीतून ढोरकीन, इसारवाडी, धनगाव या गावांना पाणीपुरवठा होतो. या जोडण्यांना मीटर लावण्यात आले आहेत. या गावांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. फारोळा शुद्धीकरण केंद्रातून कृष्णपूरला ४० हजार लीटर पाणी दर दोन दिवसांआड पुरविण्यात येते. त्यावर नियंत्रण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

सध्या शहराला मिळणारे पाणी असे
जायकवाडी धरणातून १३५ ते १४० एमएलडी इतका पाणीउपसा होतो.
फारोळा येथून शुद्ध होऊन १२५ एमएलडी पाणी सिडको व शहरासाठी जाते.
८५ टँकरद्वारे ४०० खेपा करून ३ एमएलडी पाणीपुरवठा होतो.
एन-१ येथील एमआयडीसी पंपगृहातून सुमारे २.२५ एमएलडी पाणी मिळते.
मगरबी कम्पाउंड जहाँगीर कॉलनीतील २ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
हर्सूल तलावातून ७.५ एमएलडी, नहरीतून ०.७ एमएमडी पाणी मिळते.
शहरासाठी सर्व मिळून १३६.१५ एमएलडी पाणी आणले जाते.

Web Title: The tap connections of big hotels in the city will be inspected; Order of Administrator in charge Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.