दुपारपर्यंत शाळा भरविण्यासाठी शिक्षक संघटना आक्रमक
By राम शिनगारे | Published: March 20, 2024 11:26 AM2024-03-20T11:26:16+5:302024-03-20T11:26:42+5:30
विभागीय आयुक्तांना निवेदन : शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी
छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा चढल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे जिल्ह्यातील शाळांचे वर्ग दुपारपर्यंतच भरविण्याची मागणी करणारे निवेदन शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांना मंगळवारी दिले. सध्या वातावरणात पाहिजे तसा बदल झालेला नसल्यामुळे शाळेच्या वेळेत कोणताही बदल करू नये, असे आदेश जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. त्यानंतर शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली.
जिल्ह्यात एकूण ४२०० शाळा आहेत. त्यात जि. प.च्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची संख्या २१३० इतकी आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या शाळांमध्ये एकूण ९ लाख १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. दरवर्षी उन्हाचा पारा वाढला की शाळांच्या वेळेत बदल करुन त्या सकाळच्या वेळेत अर्धवेळ भरविल्या जातात. यावर्षीही शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काही दिवसांपूर्वी विभागातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून योग्य निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार काही जिल्हा परिषदांनी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यास सुरुवात केली. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सीईओ विकास मीना यांनी १८ मार्च रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शाळेच्या वेळेत कोणताही बदल न करण्याचे आदेश दिले. तसेच परस्पर शाळेच्या वेळेत बदल केल्याचे आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्यावर कार्यवाहीचा प्रस्ताव सीईओ कार्यालयास तत्काळ सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशाच्या विरोधात शिक्षक संघटनांनी विभागीय आयुक्तांना शाळांच्या वेळेत बदल करण्याचे निवेदन दिले आहे.
विभागीय आयुक्तांना निवेदन
शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांना ग्रामीण भागात पाणीटंचाई असून, उन्हाचा पारा ३६ अंशांवर गेला आहे. जि. प.च्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक शाळा पत्र्याच्या आहेत. या शाळांत पंख्यांची सोय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. अनेक वर्षांपासून जि. प.च्या शाळा १६ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्यात येतात. हाच नियम कायम ठेवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर दिलीप ढाकणे, राजेश भुसारी, विठ्ठल बदर, श्रीराम बोचरे, महेंद्र बारवाल, बाबूलाल राठोड, गणेश शेळके, सुनील जाधव, संतोष पाटील, मनोहर गावंडे, गणेश पिंपळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सीईओंची जि. प. शाळेला भेट
सीईओ विकास मीना यांनी जिल्ह्यातील पाबळ तांडा येथील जि. प. शाळेला अचानक भेट देऊन तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गणित विषय शिकविला.