उन्हाचा पारा वाढला! छत्रपती संभाजीनगरात दुपारी चार तासांसाठी सिग्नल बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 14:32 IST2025-04-23T14:32:03+5:302025-04-23T14:32:40+5:30
छत्रपती संभाजीनगरातील बहुतांश सिग्नल आता १०० सेकंदांपेक्षा अधिक वेळेचे आहे.

उन्हाचा पारा वाढला! छत्रपती संभाजीनगरात दुपारी चार तासांसाठी सिग्नल बंद राहणार
छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे दुपारी १२ ते ४ या दरम्यान शहरातील सर्व सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी काढले आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. गेल्या आठवड्याभरात ४२.४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले. यामुळे उन्हात फिरणे देखील कठीण झाले आहे. त्यात शहरातील बहुतांश सिग्नल आता १०० सेकंदांपेक्षा अधिक वेळेचे आहे. त्यामुळे सूर्य आग ओकत असताना वाहनचालकांना सिग्नल लागल्यानंतर उभे राहणे अशक्य होत होते. ही बाब लक्षात घेत उपायुक्त नांदेडकर यांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्व सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश दिले. या दरम्यान वाहतुकीचा खोळंबा न होण्यासाठी अंमलदारांनी काळजी घेऊन हजर राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
उष्णतेपासून संरक्षणासाठी खबरदारी घ्यावी, शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे. प्रवास करताना पाण्याची बाटली, ओआरएस, ताक, लिंबूपाणी, लस्सी, फळांचे रस सोबत ठेवावे. हलक्या रंगाचे, पातळ सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री यांचा वापर करावा. सूर्यप्रकाशात जाताना चप्पल किंवा बूट घालणे आवश्यक आहे. उन्हात जास्त वेळ राहणे टाळा; शक्यतो हवेशीर व थंड ठिकाणी वेळ घालवा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.