चोरट्यांना मंदिराची घंटाही पुरेना, पिंडीवरील नाग ही चोरला; पण पळून जाताना पोलिस आडवे आले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 07:24 PM2022-05-18T19:24:39+5:302022-05-18T19:25:38+5:30
घंटा, दिवा, समई, तांब्याचा कलश, पिंडीवरील नाग असे चोरून चोरट्यांनी पळ काढला
सिल्लोड (औरंगाबाद) : अजिंठा येथील रांजनीच्या नाल्यावर असलेल्या हनुमान व महादेव मंदिरातील घंटा, दोन पितळी समई, तांब्याचा कलश व मुक्तेश्वर येथील महादेव मंदिरातील कलश, पितळी दिवा, घंटा व महादेवाच्या पिंडीवरील नाग देखील चोरीला गेल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. दरम्यान, पळून जाणारे चोरटे जळगाव जिल्ह्यातील पहूर पोलिसांनि पाठलाग करून ताब्यात घेतले आहेत. अमजद शहा कादर शहा आणि अक्रम शहा मोहमद शहा (दोघे रा.जामनेर ) असे आरोपींची नावे आहेत.
मंगळवारी सकाळी दिलीप झलवार हे रांजनी शिवारातील हनुमान व महादेव मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना मंदिरात घंटा आणि इतर साहित्य चोरीस गेल्याचे आढळून आले. याच प्रकारे मुक्तेश्वर येथील महादेव मंदिरात भास्कर सूर्यवंशी यांना सकाळी दर्शनासाठी गेल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी अजिंठा पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असे अडकले आरोपी...
सदर चोरट्यानी दोन्ही मंदिरात चोरी केली व ते चोरीचा ऐवज जामनेर येथे बाईकवर घेऊन जात होते. समोरून पहुर पोलिसांचे वाहन बघून त्यांनी बाईकचा वेग वाढवला. यामुळे संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी पोत्यातील मुद्देमाल पाहून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चोरट्यांनी अजिंठा येथील दोन्ही मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.
अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन
इकडे अजिंठा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असताना पहुर पोलिसांनी त्यांना संपर्क केला.अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते व कर्मचाऱ्यानी तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले.