कालव्यात टेम्पो उलटला; पाण्यात बुडून बापाचा मृत्यू, चिमुकलीचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 07:17 PM2023-08-29T19:17:36+5:302023-08-29T19:22:41+5:30
वळणावर रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने कालव्यात टेम्पो उलटला
- जयेश निरपळ
गंगापूर: नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या पाण्यात टेम्पो उलटून झालेल्या अपघातात सुधाकर अशोक वैराळ(३०, रा.वरखेड ता.गंगापूर ) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची तीन वर्षाची मुलगी श्रद्धा पाण्यात वाहून गेली असून तिचा शोध सुरू आहे. सदरील घटना गंगापूर वैजापूर मार्गावरील वरखेड पाटी येथील नांमक कालव्याच्या जवळ मंगळवारी (२९) रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की तालुक्यातील वरखेड येथील सुधाकर वैराळ हे सोमवारी आपल्या तीन वर्षीय मुलीसह टेम्पो (एमएच २० ईजी ०९६६) चालवत गंगापूरहून नांदूर मधमेश्वर कालव्याच्या बाजूने असलेल्या रस्त्याने वरखेड गावाकडे जात असताना दुपारी एकच्या दरम्यान गंगापूर वैजापूर मार्गापासून एक किमी अंतरावर एका ठिकाणी वळण घेतांना टेम्पो कालव्याच्या पाण्यात उलटला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन जेसीबीच्या मदतीने टेम्पो कालव्यातून पाण्याच्या बाहेर काढला. त्यांनतर सुधारक मैराळ यांना टेम्पो बाहेर घेऊन सागर शेजवळ यांच्या रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून सुधाकर यांना मृत घोषित केले. तर तीन वर्षांच्या मुलीचा शोध सुरु आहे. घटनेची शिल्लेगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे
घरात एक महिन्याची तांन्हुली
शविच्छेदनानंतर सायंकाळी साडेपाच वाजता सुधाकर यांच्या पार्थिवावर वरखेड येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, तीन बहिणी असा परिवार आहे. एक महिन्यापूर्वीच त्यांना एक मुलगी झाली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. ऐन रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला एकुलता एक भाऊ गमावल्याने सुधाकर यांच्या तिन्ही बहिणींनी हंबरडा फोडला होता.
रस्ता अडवल्याने अपघात ?
वरखेड गावात जाण्या-येण्यासाठी नांमक कालव्याच्या बाजूने रस्ता असून हा रस्ता सदरील अपघात स्थळाजवळच एका व्यक्तीने जागेचा मोबदला मिळाला नाही म्हणून अडवला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे येथे अनेकदा वाहने घसरून अपघात देखील झाले आहे. याविषयी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज करण्यात आले. मात्र तरीही प्रशासनाला जाग आली नाही. सुधाकर यांचा दुर्दैवी मृत्यू देखील अडवलेल्या रस्त्याच्या खालून पाण्याच्या बाजूने टेम्पो धोकादायक रित्या चालवताना झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.