पोहण्याचा मोह जीवावर बेतला; पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 05:27 PM2023-06-16T17:27:39+5:302023-06-16T17:30:15+5:30
तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू
दौलताबाद : पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा दौलताबाद येथील ऐतिहासिक मोंमबत्ता तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ जून रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली. विशाल अशोक शिंदे (वय २४ वर्षे, रा. टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर) असे मयत युवकाचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील विशाल अशोक शिंदे, हृषीकेश ढगे, हृषीकेश धारवे, गणेश धरमे, वैभव बनकर हे पाच मित्र दोन दुचाकींवरून गुरुवारी दौलताबाद येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी २ वाजता ते दौलताबाद घाटाखाली असलेल्या ऐतिहासिक मोंमबत्ता तलावाकडे गेले. तेथे थोडा वेळ थांबल्यानंतर विशाल शिंदे याला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. तो बोटिंगसाठी बनविलेल्या पायऱ्यांवरून खाली उतरत तलावात गेला. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला.
यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. लाकूड टाकून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. यावेळी पाण्यात बुडून विशालचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद सलगरकर, उपनिरीक्षक अयुब पठाण, ज्ञानेश्वर कोळी, संतोष धोत्रे, अविनाश बरवंत, सुधीर गायकवाड, पाटेकर, कैलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने विशाल यास पाण्याबाहेर काढले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेची दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विशाल शिंदे याचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. तो वाळूज येथील एका कंपनीत काम करीत होता.