ठाकरे गट विधानसभेच्या तयारीला लागला; छत्रपती संभाजीनगरात संपर्कप्रमुखांचे बैठकांचे सत्र
By बापू सोळुंके | Published: August 12, 2023 01:50 PM2023-08-12T13:50:30+5:302023-08-12T13:51:01+5:30
उबाठा शिवसेना संपर्कप्रमुखांकडून पूर्व, पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघात बैठका
छत्रपती संभाजीनगर : लाेकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीस सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरातील पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मुंबईचे तीन संपर्कप्रमुख नेमले आहेत. या संपर्कप्रमुखांनी दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
शिवसेनेचा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेत उभे दोन गट झाले. शिवसेना सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. शिवाय संभाजी ब्रिगेडसोबतही युती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिंदे गटाचे नेते खा. श्रीकांत शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी औरंगाबाद, जालना आणि बीड येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिवाय भाजपनेही विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क नेत्यांची नियुक्ती केली.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानेही मुंबईतील विलास राणे (मध्य), सुनील दळवी (पूर्व) आणि विजय देशमुख (पश्चिम) यांची संपर्कप्रमुख म्हणून नेमणूक केली. हे तिन्ही संपर्कप्रमुख दोन दिवसापासून शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले. पूर्व विधानसभेचे संपर्कप्रमुख सुनील दळवी यांनी ९ ऑगस्ट रोजी राजू वैद्य यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या. शिवाय त्यांनी महिला आघाडीची स्वतंत्र बैठक घेतली. पश्चिम मतदारसंघात शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. संपर्कप्रमुख विलास राणे यांनी मध्य विभागाची बैठक गुरुवारी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत घेतली.
ठाकरेंचच हिंदूत्व खरे असल्याचे घरोघरी जाऊन सांगणार
या बैठकीविषयी राणे यांनी सांगितले की, शिवसेनेच्या ४० आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली असली तरी निष्ठावान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. त्यावेळच्या परिस्थितीमुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले होते. खरे तर त्यांना या पदावर सामान्य शिवसैनिकालाच बसवायचे होते आणि ठाकरेंचेच खरे हिंदुत्व असल्याचे जनतेला घरोघरी जाऊन सांगावे, यासाठी बैठक घेतली.