एकाच दिवसांत चोरलेले माल दुकानासमोर आणून टाकला; चोरट्याच्या मनपरिवर्तनाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:54 AM2024-09-11T11:54:58+5:302024-09-11T11:57:17+5:30
दुकान मालकासह पोलिसही गेले चक्रावून, कृषी साहित्य विक्री दुकानाचे गोदाम फोडून चोरी
भराडी (छत्रपती संभाजीनगर) : येथील कृषी साहित्य विक्री करणाऱ्या दुकानाचे गोडावून फोडून चोरट्यांनी चार लाख रूपयांचा माल लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली होती; परंतु अज्ञात चोरट्यांनी हा सर्व माल सोमवारी सकाळी दुकानासमोर आणून टाकला आहे. यामुळे दुकान मालकासह पोलिसही चक्रावून गेले आहेत.
भराडी येथे यशवंता काकडे यांच्या मालकीचे श्री जिभाळेश्र्वर कृषी सेवा केंद्र आहे. या दुकानाच्या बाजूला गोडावून असून, त्याचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री कीटकनाशक औषधी, खताचे पोते, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, संगणकाचा सीपीयू असा एकूण चार लाखांचा माल लंपास केला होता. या प्रकरणी काकडे यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिस तपास करीत असताना सोमवारी सकाळी चोरट्यांनी सर्व चोरलेला माल सदर दुकानासमोर आणून टाकला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे, जमादार यतीन कुलकर्णी, तडवी आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या मालाचा पंचनामा केला. त्यानंतर हा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी चोरट्याने मनपरिवर्तन झाले असले तरी या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक विजययिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार घोडे, जमादार कुलकर्णी करीत आहेत.
चोरट्याच्या मनपरिवर्तनाची सर्वत्र चर्चा
भराडी येथील कृषी सेवा केंद्रात चोरट्याने शनिवारी रात्री चोरी करून सोमवारी सकाळी चोरलेला मुद्देमाल दुकानासमोर आणून टाकला. ही वार्ता गावात पसरताच अनेक ग्रामस्थांनी कुतुहलाने या दुकानास भेट देऊन पाहणी केली. तसेच चोरट्याने मनपरिवर्तन कसे झाले? याचीच चर्चा या भागात होताना दिसून आली.