चोरट्यांची नाथषष्ठीची वारी यंदा फसली; सतर्क पोलिसांनी तब्बल २३ चोरटे केले गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:02 PM2022-03-24T17:02:53+5:302022-03-24T17:03:58+5:30

मागील काही यात्रेतील चोरट्यांचे फोटो विविध ठिकाणी लावण्यात आले होते. दर्शन रांगेसह गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवण्यात येत होती.

The thieves' Nathashthi Wari fell this year; Vigilant police nab 23 thieves | चोरट्यांची नाथषष्ठीची वारी यंदा फसली; सतर्क पोलिसांनी तब्बल २३ चोरटे केले गजाआड

चोरट्यांची नाथषष्ठीची वारी यंदा फसली; सतर्क पोलिसांनी तब्बल २३ चोरटे केले गजाआड

googlenewsNext

पैठण ( औरंगाबाद ): नाथषष्ठीच्या गर्दीत भाविक व वारकऱ्यांना लुटण्यासाठी अवतरलेल्या तब्बल २३ चोरट्यांच्या मुसक्या पैठण पोलिसांनी बुधवारी आवळल्या. पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेले चक्रव्यूह भेदण्यात चोरट्यांना अपयश आले व ते अलगद पोलीसांच्या सापळ्यात अडकले. विशेष म्हणजे यात्रेत चोऱ्या करण्यासाठी आलेले चोरटे हे जालना, सोलापूर, बीड व हैदराबाद जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. 

पोलीसांच्या सतर्कतेमुळे यंदा चोरट्यांचा उपद्रव वारकऱ्यांना जाणवला नाही. पैठण शहरात नाथषष्ठी यात्रेसाठी लाखोच्या संख्येने वारकरी हजेरी लावतात यामुळे नाथमंदीर परिसरात मोठी गर्दी होते. गर्दीचा फायदा घेत वारकऱ्यांची लुट करण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातील चोरटेही हजेरी लावतात. यामुळे पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश यंदा स्थानिक पोलीस यंत्रणेला दिले होते. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. 

मागील काही यात्रेतील चोरट्यांचे फोटो विविध ठिकाणी लावण्यात आले होते. दर्शन रांगेसह गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवण्यात येत होती. शिवाय स्थानिक खबरेही सक्रीय करण्यात आले होते. बुधवारी सकाळी सात वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत एक एक करत तब्बल २३ चोरटे पोलीसांच्या गळाला लागले. विशेष म्हणजे यात सहा महिला चोरट्यांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या उपाययोजना लक्षात आल्याने चोरट्यांनी यात्रेतून काढता पाय घेतला.   चोरटे हैदराबाद, अहमदनगर, रोहीलागड, सोलापूर, पैठण, जामखेड, बीड, येथील रहिवाशी असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.   उपविभागीय पोलीस  अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सांगडे, सतिश भोसले, पोलीस काँस्टेबल महेश माळी, मनोज वैद्य, सुधीर ओव्हळ, गोपाळ पाटील आदी करत आहेत.

Web Title: The thieves' Nathashthi Wari fell this year; Vigilant police nab 23 thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.