कचरा टाकणारा निघून गेलेला ट्रॅक्टर चालक सीसीटीव्हीद्वारे सापडला; ५ हजार रुपये दंड वसूल
By मुजीब देवणीकर | Updated: January 19, 2024 16:00 IST2024-01-19T15:59:46+5:302024-01-19T16:00:31+5:30
स्मार्ट सिटी कार्यालयातील कमांड कंट्रोल रूममधील कॅमेऱ्याद्वारे उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर नजर

कचरा टाकणारा निघून गेलेला ट्रॅक्टर चालक सीसीटीव्हीद्वारे सापडला; ५ हजार रुपये दंड वसूल
छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीने शहरात ७५० सीसीटीव्ही प्रमुख रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी बसविले आहेत. पोलिस आयुक्तालय, स्मार्ट सिटीतील कमांड ॲन्ड कंट्रोल रूममधून २४ तास संपूर्ण शहरावर नजर ठेवली जाते. बुधवारी दुपारी जि.प. मैदानावर एक खाजगी ट्रॅक्टर चालक कचरा आणून टाकत असल्याचे कॅमेऱ्यात दिसले. कचरा टाकून निघून गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेऊन त्याला ५ हजार रुपये दंड लावण्यात आला.
स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूममधून माहिती मिळताच उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी त्वरित झोन अधिकारी रमेश मोरे, नागरी पथक प्रमुख यांना ट्रॅक्टरचा शोध घेण्याचे आदेश दिले. मनपा पथकाने त्वरित चालकासह ट्रॅक्टर मनपात आणले. जाधव यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. चालकाला ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
आता स्मार्ट सिटी कार्यालयातील कमांड कंट्रोल रूममधील कॅमेऱ्याद्वारे अशा प्रकारच्या कचरा फेकणाऱ्यांवर आपल्या तिसऱ्या डोळ्यातून नजर ठेवली जाणार आहे. यामुळे अशा लोकांनी खबरदार राहावे अन्यथा कारवाई अटळ आहे.