विवाहबाह्य संबंधाचा भयंकर अंत; प्रेयसीचे तुकडे करून मुंडके, हात गेला प्रियकर घेऊन !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 11:55 AM2022-08-18T11:55:22+5:302022-08-18T11:59:25+5:30

तीन दिवसांनंतर मृतदेहाचे उरलेले तुकडे घेऊन जात असताना प्रकार उघडकीस आला

the tragic end of an extramarital affair; Girl friend killed and cut into pieces, lover arrested with head, hands | विवाहबाह्य संबंधाचा भयंकर अंत; प्रेयसीचे तुकडे करून मुंडके, हात गेला प्रियकर घेऊन !

विवाहबाह्य संबंधाचा भयंकर अंत; प्रेयसीचे तुकडे करून मुंडके, हात गेला प्रियकर घेऊन !

googlenewsNext

औरंगाबाद : अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या विवाहित प्रेयसीचा विवाहित प्रियकराने १५ ऑगस्ट रोजी सकाळी गळा आवळून खून केला. १६ ऑगस्ट रोजी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरी येऊन धारदार हत्याराने गळा, हात धडावेगळे करीत ते अवयव घेऊन गेला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चारचाकी गाडी घेऊन येत त्यात उर्वरित राहिलेले मृतदेहाचे तुकडे गाेणीत भरून घेऊन गेला. हा धक्कादायक प्रकार एन ११, नवजीवन कॉलनी, हडको येथे बुधवारी दुपारी उघडकीस आला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा रात्री उशिरा नोंदविण्यात आला.

सौरभ बंडोपंत लाखे (३५, रा.शिऊर, ता. वैजापूर) असे या आरोपीचे नाव आहे. अंकिता महेश श्रीवास्तव (२४, रा. शिऊर, ता. वैजापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. उपलब्ध माहितीनुसार सौरभ विवाहित असून, त्याला एक मुलगी आहे. त्याचे वडील शिक्षक आणि आई अंगणवाडी शिक्षिका म्हणून निवृत्त झाले आहेत. त्याचे शिऊर गावात फर्निचरचे दुकान आहे, तर अंकिता ही मूळची जालना येथील असून, तिचा विवाह साडेचार वर्षांपूर्वी शिऊर येथील व्यावसायिक महेश यांच्याशी झाला होता. दोघांना एक साडेतीन वर्षांची मुलगी आहे. अंकिता आणि सौरभ या दोघांचे घर समोरासमोर आहे. त्यातून दोघांत काही वर्षांपूर्वी अनैतिक संबंध निर्माण झाले. या संबंधातूनच १४ डिसेंबर २०२० रोजी अंकिता पळून गेली. त्यावेळी मिसिंगची नोंद शिऊर ठाण्यात पतीने केली. यानंतर १२ मार्च २०२२ रोजी अंकिताच्या पतीने पुन्हा ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. यावर अंकितानेच शिऊर पोलिसांना आपण स्वत:हून पतीपासून विभक्त राहत असल्याचे सांगितले.

यानंतर ती औरंगाबादेतील नवजीवन कॉलनी येथील प्रवीण सुतार यांचे घर भाड्याने घेऊन राहत होती. सौरभ तिच्यासोबतच होता. त्याचे नियमित येणे-जाणे होते. शेजाऱ्यांना अंकिता १५ ऑगस्ट रोजी सकाळी एकदाच दिसली. त्यानंतर दिसलीच नाही. सौरभने १५ ऑगस्ट रोजी सकाळीच गळा आवळून तिचा खून केला. यानंतर घराला कुलूप लावून निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी धारदार हत्यार सोबत आणले. त्या हत्याराने अंकिताचे मुंडके, हात धडावेगळे केले. दोन्ही अवयव एका पिशवीत भरून घेऊन त्याने शिऊर येथील त्याच्या फर्निचरच्या गोडावूनमध्ये ठेवले. बुधवारी खुनाला तिसरा दिवस सुरू झाल्यामुळे खोलीतून दुर्गंधी सुटली. उर्वरित मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सौरभ एर्टिगा गाडी (एमएच २० सीएच ३०७६) घेऊन आला. सोबत त्याचा मित्र सुनील गंगाधर धनेश्वर (रा. शिऊर) होता. दोघांनी उर्वरित मृतदेह गोणीत भरून गाडीच्या पाठीमागील सीटखाली ठेवून सुसाट वेगाने निघून गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी उपनिरीक्षक रमेश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला.

...अन् शेजाऱ्याने मालकाला कळवले
अंकिताच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरू महिलेने तीन दिवसांत अनेकवेळा फोन केला. मात्र अंकिताचा फोन सौरभ उचलत होता. तो तिच्याशी बोलणेही करून देत नव्हता. बुधवारी सकाळी अंकिताच्या रूमच्या खिडकीजवळ प्रचंड वास येऊन माशा घोंघावत होत्या. ही माहिती भाडेकरू महिलेने घरमालक प्रवीण सुतार यांना कळविली. तसेच एकजण चारचाकी गाडीत अंकिताच्या रूममधून गोणी घेऊन गेला. त्याचा प्रचंड वास येत असल्याचेही सांगितले. त्याचवेळी समोरच्या दुकानदाराने चारचाकी गाडीचा नंबर लिहून ठेवला. मालक सुतार आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती सिडको ठाण्यात जाऊन निरीक्षक संभाजी पवार यांना दिली.

सिडको पोलिसांची समयसूचकता
निरीक्षक पवार यांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गाडी नंबर आणि सौरभचा माेबाईल नंबर दिला. त्यावरून कन्नड, खुलताबाद, देवगाव रंगारी, शिऊर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नाकाबंदी लावली. देवगाव रंगारी पोलिसांच्या ठाण्यासमोर संशयित गाडी येताच पोलिसांनी अडवली. त्यात दोन्ही आरोपी आढळून आले. तसेच मृतदेहाचा काही भागही सापडला. देवगाव रंगारी पोलिसांनी सिडको पोलिसांना गाडी पकडल्याची माहिती दिली. त्यानंतर सिडकोचे उपनिरीक्षक अशोक अवचार पथकासह आरोपींसह मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले. सपोनि अमोल मोरे, उपनिरीक्षक देविदास खाडकुळे, हवालदार भावसिंग जारवाल, विनोद तांगडे, विद्या चव्हाण, पुष्पा तांगडे, डी. जी. कोळी यांच्या पथकाने पंचनामा करून मृतदेहासह आरोपी, गाडी उपनिरीक्षक अवचार यांच्याकडे सुपूर्द केली.

खुनाची माहिती व्हॉट्सॲपवर
आरोपी सौरभ हा स्थानिक ठिकाणी यू ट्यूब चॅनल चालवतो. तो पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या विविध ग्रुपमध्ये सहभागी आहे. त्यातील एका ग्रुपवर त्याने ‘मी खून केला आहे’, असा मेसेज देवगाव रंगारी पोलीस दिसताच टाकला. त्या मेसेजला इतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यानंतर त्याने देवगाव रंगारी ठाण्यात दाखल होत असल्याचे सांगितले. तसेच सिडको ठाण्यातही येणार असल्याची माहिती त्याने व्हाॅट्सॲपवर दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त अशोक थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सिडकोचे निरीक्षक संभाजी पवार, विनोद सलगरकर, सपोनि ज्ञानेश्वर अवघड, श्रद्धा वायदंडे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी
नवजीवन कॉलनी येथे महिलेचा खून झाला असल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. गर्दीला आवरताना पोलिसांची मोठी दमछाक झाली असल्याचे चित्र दिसून आले.

गाडीवाल्याने नकार दिल्यामुळे मृतदेहाचे तुकडे
१६ तारखेला सकाळीच सौरभने अंकिताचा मृतदेह गाडीत टाकला. मात्र, गाडीचालकाने पोलीस ठाण्यात किंवा दवाखान्यात घेऊन जाईन, असे सांगितले. त्यामुळे सौरभने पुन्हा अंकिताच्या घरी मृतदेह आणून टाकला. यानंतर त्याने हत्यार आणून तिचे मुंडके, हात तोडून नेले. बुधवारी सकाळी उर्वरित मृतदेह घेऊन जाताना घटना उघडकीस आली. अंकिता विवाहासाठी तगादा लावत असल्यामुळे तिला कायमचे संपविले असल्याची माहिती समोर आली आहे.

खोलीत सापडली पाच पाने
अंकिताने पाच पानभर सगळा वृत्तांत लिहून ठेवला आहे. यात तिने माहेरचे नातेवाईक, मुलीची आठवण येत असल्याचेही लिहिले आहे.

Web Title: the tragic end of an extramarital affair; Girl friend killed and cut into pieces, lover arrested with head, hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.