भंडारदऱ्याची सहल ठरली काळरात्र; औरंगाबादच्या दोघांना ओढ्यात कारसह जलसमाधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:54 AM2022-07-16T11:54:46+5:302022-07-16T11:58:09+5:30
पेंडशेत जात असताना रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले होते. पुढे ओढ्याला पूर आलेला होता. हा ओढा कारमधील या तिघांना दिसला नाही. त्यांनी कार पाण्यात घातली व पुराच्या लोंढ्यात ते वाहून जाऊ लागले.
औरंगाबाद : भंडारदरा येथे सहलीसाठी गेलेल्या औरंगाबादेतील तीन वकिलांची कार ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने दोघांना जलसमाधी मिळाली. एकाने प्रसंगावधान राखून कारमधून उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला. कोल्हार घोटी (ता. अकोले, जि. अहमदनगर) रस्त्यावरील वारंघुशी ते पेंडशेतदरम्यान शुक्रवारी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. घटनास्थळ दुर्गम असल्याने राजूर पोलिसांना तेथे पोहोचण्यास रात्री ११ वाजले होते. ॲड. आशिष प्रभाकर पालोदकर (३४, रा. पालोद, ता. सिल्लोड), रमाकांत प्रभाकर देशमुख (३४, रा. ताडपिंपळगाव, ता. कन्नड), अशी मृतांची नावे आहेत, तर ॲड. अनंता रामराव मगर (रा. शिंगी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) हे यातून सुदैवाने बचावले. ॲड. आशिष पालोदकर हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस नेते प्रभाकर पालोकदर यांचे धाकटे चिरंजीव होत.
राजूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील तीन पर्यटक भंडारदरा येथे कारने शुक्रवारी गेले होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते वारंघुशी ते पेंडशेत जात असताना रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले होते. पुढे ओढ्याला पूर आलेला होता. हा ओढा कारमधील या तिघांना दिसला नाही. त्यांनी कार पाण्यात घातली व पुराच्या लोंढ्यात ते वाहून जाऊ लागले. प्रसंगावधान राखून ॲड. अनंता यांनी कारमधून उडी घेतल्याने ते वाचले, तर ॲड. आशिष आणि रमाकांत हे कारसह वाहून गेले. याच वेळी तेथून आणखी एक जण वाहून गेल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून काही अंतरावरच आशिष आणि रमाकांत यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. हे मृतदेह पोलिसांनी राजूरच्या शासकीय रुग्णालयात हलविले.
आधार कार्डमुळे पटली ओळख
पोलिसांना तेथे दोन मृतदेह आढळले होते. ॲड. अनंता हे मृत्यूच्या दाढेतून परत आल्याने ते प्रचंड घाबरले होते. त्यांना मृतांची नावेही सांगता येत नव्हती. पोलिसांना मृतांच्या पँटच्या खिशातील पाकिटात त्यांचे आधार कार्ड आढळले. या आधार कार्डांमुळे दोघांची ओळख पटविण्यात यश आल्याचे राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितले.
ट्रॅक्टर- जेसीबीने ओढून काढली कार
पर्यटकांसह कार ओढ्यात वाहून गेल्याचे कळताच प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि राजूर पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टरने ही कार ओढून बाहेर काढली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कारमधील ॲड. आशिष आणि रमाकांतचे निधन झाले होते. ही कार बाहेर काढण्यासाठी सपोनि साबळे, कर्मचारी दिलीप डगळे, अशोक गाडे, अशोक काळे यांच्यासह प्रत्यक्षदर्शींनी मदत केली.
आशिष अविवाहित...
अपघातात मृत्युमुखी पडलेले ॲड. आशिष पालोदकर हे अविवाहित आहेत. ते खडकेश्वर येथे आई, वडिलांसह राहत होते व जिल्हा कोर्टात वकिली करीत होते, तर रमाकांत देशमुख हे विवाहित असून शेती करायचे. त्यांना मुलगा, मुलगी आहे.