दोघींच्या भांडणावरून दोन गट भिडले; हाणामारीत तरुणाचा भोसकून खून
By राम शिनगारे | Published: November 7, 2023 03:59 PM2023-11-07T15:59:11+5:302023-11-07T16:01:25+5:30
तरुणाचा जागीच मृत्यू : एकाच कुटुंबातील तिघांना अटक
छत्रपती संभाजीनगर : घराच्या समोरासमोर राहणाऱ्या दोन महिलांची भांडणे सुरू झाली. त्यातील एका महिलेने जवळच्या तरुणास फोन करून बोलावून घेतले. तो सोबत मित्रांना घेऊन आला. त्यामुळे दोन कुटुंबात हाणामारी सुरू झाली. दुसऱ्या कुटुंबातील महिलेनेही तिच्या ओळखीच्या एकाला बोलावून घेतले. त्यानेही दोन मित्रांना सोबत आणले. त्यातुन झालेल्या हाणामारीत एका तरुणास चाकूचा छातीवर घाव लागला. त्यातच तो जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील गुरुदत्तनगरातील गल्ली नंबर २ मध्ये घडली. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात खूनाचा गुन्हा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला.
गणेश मारुती राऊत (२८, रा. साईनगर, गुरुदत्तनगरजवळ, गारखेडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींमध्ये सागर विक्रम केसभट (पाटील), बहिण-भाऊ अमृता व निलेश कमलाकर दिक्षीत, त्यांची आई गिरीजा कमलाकर दिक्षीत यांच्यासह दोन अनोळखीचा समावेश आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री १०.४० वाजता प्रिती राहुल मुळे (रा. गुरुदत्तनगर, गल्ली नं.२, गारखेडा) यांनी मृत गणेशला फोन करून घरी बोलावून घेतले. त्याठिकाणी प्रिती यांचे घरासमोर राहणाऱ्या दिक्षीत कुटुंबासोत भांडण सुरू होते. त्या भांडणात गणेश यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांनी भाग घेतला. त्याचवेळी दिक्षीत कुटुंबाच्या मदतीला सागर केसभट (पाटील) हा आला. त्यानेही सोबत दोन मित्रांना आणले होते. मुळ भांडण करणारे बाजूला राहुन इतर ठिकाणाहून आलेल्यांमध्येच तुंबळ हाणमारी लागली.
त्यात गणेश राऊत यांच्या छातीवर सागर केसभट पाटील याने चाकूचा वार केला. त्यामुळे गणेश खाली कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जखम गणेशला घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणात गणेशची आई पुजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून दीक्षीत कुटुंबातील तीन जणांसह सागर केसभट व त्याच्या अनोळखी दोन मित्रांवर खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच दिक्षीत कुटुंबाच्या तक्रारीवरून प्रिती राहुल मुळे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले.