दोन गट आपसांत भिडले अन् पोलीस येताच पळून गेले; ४८ तासांत शहरातील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 12:21 PM2022-04-09T12:21:54+5:302022-04-09T12:22:34+5:30
प्रियदर्शनी उद्यानातील नियोजित बाळासाहेब ठाकरे स्मारकाजवळील घटना
औरंगाबाद : शहरात विविध भागांत जमाव जमवून एकामेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडांनी मारहाण करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अहिल्याबाई होळकर चौकात दाेन गट भिडल्याच्या घटनेला ३६ तास होण्याच्या आत प्रियदर्शनी उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाजवळ दोन गट आपसांत भिडले. ही घटना शुक्रवारी (८ एप्रिल) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच दोन्ही गटांच्या तरुणांनी धूम ठोकली. या प्रकरणी सिडको ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.
प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन गट आपसांत भिडले. सुरुवातीला दोन युवकांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यातील एकाने समर्थकांना बोलावून घेतले. काही वेळात १०० ते १५० युवक घटनास्थळी जमा झाले. रस्त्यावर दगड घेऊन एकमेकांना मारू लागले. यात एका युवकाचे डोके फुटले. दोन दुचाकींवरही दगडफेक करण्यात आली. एकाच बाजूचा जमाव अधिक असल्यामुळे दुचाकीवरील युवकाला दोन जण दांड्याने मारहाण करीत होते. स्मारकासमोरील रस्त्यावरून द्वारकादास श्यामकुमार या कपड्यांच्या शोरूमपर्यंत मारहाण करीत आणले. त्याचवेळी चिश्तिया चौकी येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती समजताच धाव घेतली. पोलिसांना पाहताच तरुणांनी घटनास्थळावरून पोबारा केला. दुचाकीवरील जखमी युवकास रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर काही वेळात सिडको निरीक्षक संभाजी पवार हे पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत जमाव पांगला होता. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून गोंधळ घालणारांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती निरीक्षक पवार यांनी दिली.
अन्नपूर्णा हॉटेलमध्ये टोळक्याची पोलीस पुत्राला मारहाण
प्रियदर्शनी उद्यानातील हाणामारीची घटना घडल्यानंतर काही वेळातच याच परिसरातील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये मोबाईलवर बोलण्यावरून एका टोळक्याने पोलीस अधिकाऱ्याच्या पुत्रास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या ठिकाणी निरीक्षक पवार यांनी भेट देत मारहाण झालेल्या युवकास तक्रार देण्याचा आग्रह केला. मात्र, त्याने नकार दिला. या ठिकाणी मारहाण करणाऱ्या आणि मार खाणाऱ्या अशा दोन्ही गटांतील युवकांनी मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
कोकणवाडी प्रकरणी पोलीस बघ्याच्या भूमिकेत
कोकणवाडीतील आहिल्याबाई होळकर पुतळा परिसरात बुधवारी मध्यरात्री दोन गट आपसात भिडले होते. त्याठिकाणी दोन्ही बाजूंनी २०० पेक्षा अधिक युवक जमा झाले होते. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एमआयएम नेते अरुण बोर्डे आणि राजू आमराव गटात ही हाणामारी झाली होती. या घटनेनंतर दोन्ही गटांनी आपसात बसून मतभेद मिटविले. त्यामुळे पोलिसात कोणीही तक्रार देण्यास आला नाही. मात्र, किरकोळ ठिकाणी जमाव जमा झाल्यास पोलीस स्वत:हुन गुन्हे दाखल करतात. कोकणवाडीत मोठ्या प्रमाणात जमाव जमा होतो. हाणामारी करतो. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पोलिसांनी स्वत:हुन फिर्यादी होत गुन्हा नोंदवला नाही. एकूण प्रकरणात पोलिसांनी बघ्याची भूमिकाच घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.