गणवेशाचा निधी उचलण्यापूर्वीच गेला परत; पुरवठादारांची बिले कशी देणार, मुख्याध्यापक चिंतेत
By विजय सरवदे | Published: August 31, 2023 07:39 PM2023-08-31T19:39:09+5:302023-08-31T19:40:26+5:30
समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जातात.
छत्रपती संभाजीनगर : मोफत गणवेश वाटप योजनेद्वारे जिल्हा परिषद शाळांतील मुलांना १४ ऑगस्टपूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील गणवेश वाटप करण्यात आले. दरम्यान, गणवेशाचा दिलेला हा निधीच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परत घेतल्यामुळे पुरवठादारांची बिले अदा कशी करावीत, असा प्रश्न मुख्याध्यापकांना सतावत आहे.
समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जातात. प्रति विद्यार्थी प्रति गणवेश ३०० रुपयांचा निधी दिला जातो. यंदा २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पहिला गणवेश वाटप केला. त्यानंतर दुसरा गणवेश हा १४ ऑगस्ट अगोदर स्काऊट गाईडसाठी आवश्यक मुला-मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि मुलांसाठी गडद निळ्या रंगाची पँट आणि मुलींसाठी गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा सलवार देण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार शालेय व्यवस्थापन समित्यांनी पुरवठादार निश्चित करून गणवेश वाटप केले. जिल्ह्यातील २ लाख ९ हजार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले असून यापैकी ७० हजार गणवेशांची बिले अदा झाली आहेत. यामध्ये कन्नड आणि पैठण तालुक्यातील शाळांना थोडाफार निधी वाटप झाला आहे. मात्र, उर्वरित ७ तालुके निधीपासून वंचित राहिले आहेत.
दरम्यान, शिक्षणाधिकारी कार्यालयातील समग्र शिक्षा अभियानास राज्यस्तरावरून प्राप्त झालेला ४ कोटी ३३ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा निधी पंचायत समित्यांमधील त्यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरित केला होता. शाळांनी गणवेशाचे वाटप केल्यानंतर बिले सादर केली. मात्र, यापैकी ३ कोटी ८३ लाख ३२ हजार २०० रुपयांचा निधी समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्पाने काढून घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्याध्यापकांची भंबेरी उडाली. पुरवठादारांनी तर बिलांसाठी तगादा लावला आहे. आता त्यांची समजूत काढावी कशी, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
निधी मिळेल, काळजी नसावी
यासंदर्भात ‘लोकमत’ने जिल्हा समग्र शिक्षा अभियान कार्यालयाशी संपर्क साधला असता, शासनस्तरावर या निधीची पुनर्रचना केली जात असल्यामुळे तो परत गेला आहे. चार-आठ दिवसांत तो परत येईल. निधी वितरणाची प्रक्रिया बंद झालेली नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनी संभ्रमात पडण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले.
३ कोटी ८३ लाखांची रक्कम गेली परत
तालुका - एकूण निधी - वाटप निधी - परत गेलेला निधी
औरंगाबाद - ६१६१७००- ००- ६१६१७००
फुलंब्री- २७८०१००- ००- २७८०१००
सिल्लोड- ५४६९७००- ००- ५४६९७००
सोयगाव- २४९४२००- ००- २४९४२००
खुलताबाद- २१८८२००- ००- २१८८२००
गंगापूर- ५८९८३००- ००- ५८९८३००
वैजापूर- ६०१११००- ००- ६०१११००
पैठण- ६०९२१००- ४९८९३००- ११०२८००
कन्नड- ६४०४१००- ७८०००- ६३२६१००