विनाकळसाचे अनोखे शिवमंदिर, गाभऱ्यातच नंदी; १०४४ नॅनो आरशांतून होते केशरीनाथांचे दर्शन
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 7, 2023 03:20 PM2023-08-07T15:20:36+5:302023-08-07T16:03:46+5:30
गाभाऱ्यात शिवलिंगाच्या अवतीभोवती चारी भिंतीवर नॅनो आरसे बसविण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शहरात अतिप्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकीच एक केशरसिंगपुऱ्यातील केशरीनाथ शिव मंदिर होय. हे मंदिर सुमारे ३५० वर्ष जुने आहे. आणि गाभाऱ्यात चोहीबाजूने बसविलेल्या १०४४ नॅनो आरशात प्रतिबिंब दिसते. ३५० वर्षांपूर्वी राजा केशरसिंग यांचे या परिसरात वास्तव्य होते. त्यांच्याच नावाने म्हणजे केशरसिंगपुरा आजही ओळखला जातो. राजा महादेवाचा भक्त होता. त्यानेच हे मंदिर उभारले, असे सांगितले जाते.
गाभारा जमिनीपासून ८ फूट खोल
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग हे जमिनीपासून ८ फूट खोल आहे. एक खोलीतून पायऱ्या उतरून तिसऱ्या खोलीत म्हणजे गाभाऱ्यात जाता येते. बाहेरूनही शिवलिंगाचे दर्शन होते.
सुंदर नक्षीकाम केलेली दगडाची चौकट
मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना एक सुंदर नक्षीकाम केलेली दरवाजाची चौकट लक्ष वेधून घेते. या चौकटीला सोनेरी रंग देण्यात आला आहे.
गाभाऱ्यात काचकाम
गाभाऱ्यात ३५० वर्ष जुने शिवलिंग आहे. ते ५ बाय २ फुटाचे शिवलिंग आहे. मूळ पाषाणाच्या या पिंडीवर तांब्याचे कवच चढविण्यात आले आहे. गाभारा थंड राहावा म्हणून २०१२ मध्ये या गाभाऱ्यात काचकाम करण्यात आले. काचेमध्ये पारा असतो. यामुळे गाभाऱ्यात थंडावा निर्माण होण्यास ते पूरक ठरतात. काही आरशाचा पारा निघाला आहे.
नॅनो आरशातून शिवलिंगाचे सहस्त्रदर्शन
गाभाऱ्यात शिवलिंगाच्या अवतीभोवती चारी भिंतीवर नॅनो आरसे बसविण्यात आले. यात प्रत्येक कोपऱ्यात २०१ आरसे, असे ८०४ आरसे व दक्षिण व उत्तर बाजूच्या भिंतीवर दोन्ही बाजूस मिळून २४० आरशाची चौकट तयार करण्यात आली आहे. एकूण १०४४ आरशांमधून महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. हे पाहून भाविक भारावून जातात.
गाभाऱ्यातच नंदी
केशरीनाथ शिव मंदिराला कलश नाही. इतर महादेव मंदिराबाहेर नंदीचे स्थान असते; पण केशरीनाथ शिवलिंगच्या बाजूलाच नंदी विराजमान आहे. पुजारी डोलारे यांनी सांगितले जाते की, ३५० वर्षांपूर्वी परकीयांच्या हल्ल्यापासून मंदिराला वाचविण्यासाठी कळश चढविण्यात आला नाही. तसेच नंदीलाही गाभाऱ्यात ठेवण्यात आले. यामुळे येथे मंदिर आहे, हेच बाहेरून कोणाला कळत नव्हते. यामुळे मंदिराचे रक्षण झाले.