अवकाळी पावसाने नुकसानीसोबत फायदाही झाला; मराठवाड्यात रब्बीचा पेरा दुप्पटीने वाढला
By बापू सोळुंके | Published: December 14, 2023 01:20 PM2023-12-14T13:20:45+5:302023-12-14T13:22:00+5:30
आता कमी पावसावर येणारा हरभरा, शाळू ज्वारी, गहू, करडई इ. पिकांची पेरणी सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : अत्यल्प पावसामुळे मागील हप्त्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत रब्बी पिकांच्या पेरणीचे प्रमाण सरासरी २२ ते २५ टक्केच होते; मात्र मागील पंधरा दिवसांत मराठवाड्यात ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी, हरभऱ्यासह अन्य पिकांच्या पेरणीला सुरुवात केल्याने पंधरा दिवसांत रब्बीचा पेरा दुप्पट झाल्याचे दिसून येते.
मराठवाड्यात पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. परिणामी, मराठवाड्यातील ६९ तालुक्यांतील ४२७ मंडळांतील खरीप हंगामातील पिके वाळून गेली होती. शासनानेही या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम मदत देण्याची घोषणा केली होती. कमी पावसामुळे मराठवाड्यातील खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांहून खाली आले आहे. पावसाळ्यात प्रार्थना करूनही पाऊस पडत नव्हता. आता मागील पंधरा दिवसांत मराठवाड्यातील अनेक कृषी मंडळांत मुसळधार अवकाळी पाऊस पडला. सोबत गारपीटही झाल्याने शेतीमालाचे नुकसान झाले; पण नुकसान झाले, तसा त्याचा काही प्रमाणात फायदाही झाल्याचे दिसून येते. जमिनीतील ओलावा वाढल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली.
पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील केवळ २२ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती; मात्र आता कमी पावसावर येणारा हरभरा, शाळू ज्वारी, गहू, करडई इ. पिकांची पेरणी सुरू आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९७ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. ही सरासरी रब्बी हंगामातील पीकपेऱ्यांच्या ५० टक्के आहे. जालना जिल्ह्यात १ लाख ६,८९७ हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यातील सर्वसाधारण रब्बी क्षेत्राच्या ४९ टक्के आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५८६ हेक्टरवर पेरणी झाली. सरासरी क्षेत्राच्या ८६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
या पिकांना शेतकऱ्यांचे प्राधान्य
गहू- ४९९०८ हेक्टर
रब्बी ज्वारी- २११४८० हेक्टर
हरभरा- १७९९३१ हेक्टर
मका- १७२७ हेक्टर
इतर कडधान्ये- २५९१ हेक्टर
जवस, करडई, तीळ इ. गळीत धान्ये- १६८२ हेक्टर