ठाकरे गटाच्या मेळाव्यात ‘वरचा’ मजला रिकामाच ! संजय राऊतांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 01:11 PM2023-06-09T13:11:27+5:302023-06-09T13:13:47+5:30
शिवसैनिकांनी फिरवली पाठ; शिवसेनेला धगधगता इतिहास आहे म्हणूनच शिवसेना मुंबईत ५० वर्ष, तर मराठवाड्यात ३८ वर्षांनंतर टिकून आहे.
छत्रपती संभाजीनगर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मेळाव्याला शिवसैनिकांकडून थंड प्रतिसाद दिल्याने गुरुवारी संत एकनाथ रंग मंदिराची गॅलरी (वरचा मजला) पूर्णपणे रिकामी होती, तर स्टेजवर शिवसेनेचे नेते अणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे चित्र पाहून संतापलेले शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी नेत्यांचे कान टोचले.
शिवसेनेला धगधगता इतिहास आहे म्हणूनच शिवसेना मुंबईत ५० वर्ष, तर मराठवाड्यात ३८ वर्षांनंतर टिकून आहे. नेत्यांनी इतिहासासोबत आपल्या ताब्यात किती भूगोल आहे, याचा अभ्यास करावा, अशा शब्दात नेत्यांना त्यांनी सुनावले. मराठवाड्यातील शिवसेना शाखा स्थापनेचा ३८वा वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा जिल्हास्तरीय मेळावा खा. राऊत यांच्या उपस्थितीत गुरुवारी संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे, आ. उदयसिंग राजपूत, अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महिला आघाडी संघटक सुनीता आऊलवार आदींसह ६९ पदाधिकारी विराजमान होते. यावेळी आ. दानवे यांनी मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या स्थापनेपासून आतापर्यंत शिवसेनेची वाटचाल सांगितली. पैठण, गंगापूरसाठी १७६५ कोटी रुपयांची सिंचन योजना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच सप्टेंबर २०२०मध्येच मंजूर केल्याचे सांगितले. गतवर्षी शहरातील पाण्यासाठी आक्रोश मोर्चा काढणारे फडणवीस सत्तेवर आल्यानंतर केवळ ३ किलोमीटर पाइप टाकण्याचे काम झाल्याचे नमूद केले.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना खा.राऊत यांनी सुरुवातीलाच रंगमंदिराच्या रिकाम्या गॅलरी पाहून संताप व्यक्त केला, आताच नेत्यांनी शिवसेनेचा इतिहास सांगितला. धगधगता इतिहास आहे, म्हणून मराठवाड्यात ३८ वर्ष आणि मुंबईत ५० वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेना टिकून राहिली. इतिहास हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातच असतो. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मला सांगायचे की आपल्या ताब्यात किती भूगोल आहे, याचा अभ्यास करा. मराठवाडा मोठा आहे, इतका मोठा जिल्हा आहे, यापूर्वी काही ८ जूनला आम्ही येेथे उपस्थित राहिलो; पण समोरची गॅलरी कधी रिकामी पाहिली नाही. इतिहासासोबतच भूगोलाचा अभ्यास करावा, चिंतन करावे, अशा शब्दात त्यांनी कान टोचले. यावेळी खा. खैरे यांनी शिंदे गटाचे आमदार पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी सूत्रसंचालन नंदकुमार घोडेले यांनी केले.