‘वंचित’ फॅक्टर ठरणार भारी, महापालिकेत शिवसेनेला मिळेल ‘बळ’, युतीमुळे वंचितचाही फायदा

By मुजीब देवणीकर | Published: December 1, 2022 07:13 PM2022-12-01T19:13:29+5:302022-12-01T19:18:52+5:30

‘वंचित’सोबत युतीने शिवसेनेस भाजपची उणीव भरून काढता येईल

The 'VBA' factor will be heavy, Shiv Sena will get 'strength' in the municipal corporation by alliance with VBA | ‘वंचित’ फॅक्टर ठरणार भारी, महापालिकेत शिवसेनेला मिळेल ‘बळ’, युतीमुळे वंचितचाही फायदा

‘वंचित’ फॅक्टर ठरणार भारी, महापालिकेत शिवसेनेला मिळेल ‘बळ’, युतीमुळे वंचितचाही फायदा

googlenewsNext

- मुजीब देवणीकर
औरंगाबाद :
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नवीन राजकीय समीकरणे जन्माला घालायला सुरुवात केली. शिवसेनेसोबत वंचित बहुजन आघाडीने युती करण्याची तयारी दर्शविली. हा प्रयोग यशस्वी झाल्यास औरंगाबाद महापालिकेच्या राजकारणात सेनेला मोठे ‘बळ’ मिळण्याची दाट शक्यता आहे. मागील तीन दशकांत महापालिकेत भाजपने लहान भाऊ म्हणून भूमिका बजावली. भविष्यात ही जागा ‘वंचित’ला मिळू शकते. शिवशक्ती-भीमशक्तीमुळे दोन्हीकडे सध्या तरी आनंदाचे वारे वाहत आहेत.

एप्रिल २०२० मध्ये महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपला. निवडणुका कधी होतील हे निश्चित नाही, मात्र, सर्वच पक्षांतील इच्छुक थोड्याफार प्रमाणात का होईना कामाला लागले आहेत. त्यातच शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची प्रक्रिया सुरू झाली. वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी तर युतीसाठी आमचा होकार असल्याचे घोषित केले. त्यामुळे युतीसंदर्भातील घोषणेची औपचारिकता शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र झाल्यास बहुमताच्या आकड्यापर्यंत जाणे सेनेला फारसे अवघड जाणार नाही. गरज पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही मदत घेतली जाऊ शकते.

तीन दशके सेनेचे निर्विवाद वर्चस्व
महापालिकेच्या राजकारणात सेनेला कधीही एकहाती बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही. मात्र, भाजप, अपक्षांच्या मदतीने नेहमी सत्तेत राहून निर्विवाद वर्चस्व गाजविता आले. सध्या शिवसेनेसोबत भाजप नाही. पक्षातील एक मोठा गट बाहेर पडला. या गटात शहरातील दोन आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला थाेड्याफार प्रमाणात का होईना धक्का बसू शकतो. शिंदे गट, भाजप सहकार्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी वंचितसोबत युती प्रभावी ठरू शकते.

‘वंचित’ची मशागत सुरूच
मागील अडीच वर्षांत वंचितने शहरात बऱ्यापैकी राजकीय मशागत केल्याचे दिसून येते. कोणत्या वॉर्डातून कोण संभाव्य उमेदवार प्रभावी ठरू शकतो, याच अभ्यास करण्यात आला. समविचारी उमेदवारांना पक्षात येण्यासाठी गळही घालण्यात आली. ‘वंचित’कडे उमेदवारांची मोठी रांग आहे.

आमचा होकार, पण...
‘वंचित’ने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर युतीसाठी होकार दिला. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसाेबत चर्चा करून अंतिम निर्णय घ्यायचा आहे. युती झाल्यास निश्चितच दलित-मुस्लीम मोठ्या संख्येने ‘वंचित’सोबत राहतील. भाजपला सत्तेपासून रोखणे हेच एकमेव ध्येय आमचे आहे. काँग्रेसला पर्याय म्हणून नागरिकांनी एमआयएमला मते दिली. त्यांचे निवडून आलेल्या नगरसेवक जनतेच्या कसोटीवर उतरू शकले नाहीत.
- फारूक अहेमद, प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

निर्णय पक्षप्रमुख घेतील
‘वंचित’सोबत युती करण्याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य राहील. या युतीमुळे सेना-वंचितचा फायदाच होणार आहे. शहराचे राजकीय समीकरणही बदलेल.
- किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख शिवसेना

Web Title: The 'VBA' factor will be heavy, Shiv Sena will get 'strength' in the municipal corporation by alliance with VBA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.