'वंचित'कडून लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; महाविकास आघाडीत हव्यात 'इतक्या' जागा
By स. सो. खंडाळकर | Updated: December 27, 2023 14:13 IST2023-12-27T14:08:47+5:302023-12-27T14:13:26+5:30
वंचितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल

'वंचित'कडून लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; महाविकास आघाडीत हव्यात 'इतक्या' जागा
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या ४८ जागांची समान विभागणी व्हावी, प्रत्येकी १२ जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा, असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले.आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष केंद्रामध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीत नाहीत. दोन पक्ष फुटीमुळे कमकुवत आहेत. काँग्रेसचा मागच्या वेळी एकच खासदार होता. त्यामुळे हे तिन्ही पक्ष पर्याय होऊ शकत नाहीत.
वंचित बहुजन आघाडीकडे मते आहेत. गेल्या पाच वर्षांत वंचितचा जनाधार वाढला असल्याचा दावा ठाकूर यांनी केला. उरलेले तीन पक्ष हे सवर्ण लोकांचे पक्ष आहेत, संविधान बदलले तर यांना फार फरक पडणार नाही. कारण सवर्ण समाजाला सुरक्षा देण्याचेच भाजप सरकारचे धोरण आहे. संविधानातील बदलामुळे शूद्र, अतिशूद्र, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, दलित, मुस्लिम, वंचितांना आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होईल. म्हणून वंचितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे ठाकूर यांनी सूचित केले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग, प्रवक्ते फारुक अहमद आदींची उपस्थिती होती.