पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा उडाला; एका बेंचवर तिघांना बसून परीक्षा देण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 01:09 PM2022-06-02T13:09:26+5:302022-06-02T13:20:53+5:30
. ऐनवेळी क्षमतेपेक्षा अधिक परीक्षार्थ्याना शहरातील काबरा महाविद्यालय हे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने उडाला गोंधळ
औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली. मात्र, विद्यापीठाचे विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन पूर्णतः ढेपाळले असल्याचे आज सकाळच्या सत्रातील पेपर दरम्यान उघडकीस आले. ऐनवेळी क्षमतेपेक्षा अधिक परीक्षार्थ्याना शहरातील काबरा महाविद्यालय हे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने एका बेंचवर दोन किंवा तीन परीक्षार्थी बसून पेपर देत असल्याचे चित्र दिसून आले.
कोरोना संसर्ग कमी झाल्याने यावर्षीपासून परीक्षा ऑफलाइन घेण्यात येत आहे. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी पहिल्यांदाच लेखी परीक्षेला सामोरे जात आहेत. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा बुधवारी सुरू झाल्या. पहिल्या दिवशी बॅकलाॅग विद्यार्थ्यांचा पेपर होता. तर आज नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. बॅकलाॅगचे विद्यार्थी असल्याने परीक्षा केंद्रांवर विद्यार्थीसंख्या कमी होती. यामुळे सर्वकाही सुरळीत झाले. मात्र, आज नियमित पेपरसाठी शहरातील काबरा महाविद्यालयात तब्बल २०० विद्यार्थी अतिरिक्त ठरले. महाविद्यालयात ६०० विद्यार्थांच्या बैठकीची क्षमता आहे. काल येथे ४३६ विद्यार्थ्यांनी पेपर दिला. तर आज अधिकचे ७०० विद्यार्थी येथे आले. त्यामुळे महाविद्यालयाची बैठक व्यवस्था अपुरी पडली. महाविद्यालयाने वेळेचे महत्व ओळखून एका बेंचवर तीन विद्यार्थी बसवले. तसेच उपलब्ध जागेत खुर्च्या, टेबल टाकून बैठक व्यवस्था केली.
सकाळी ९ वाजताचा पेपर दीडतास उशिरा सुरु
आज बीएस्सी संगणक शास्त्र, आयटी आणि बायोटेक चा पहिला पेपर होता. सकाळी नऊ वाजता सुरु होणारा पेपर विद्यार्थी संख्या अचानक वाढल्याने साडेदहा वाजता सुरु झाला. यावेळी एका बेंचवर तीनजण बसून पेपर देत होते. तर दोनशे विद्यार्थ्यांचे क्रमांक या केंद्रावर आढळून आले नाहीत. त्यांचीही परीक्षा विद्यापीठाच्या सुचनेनुसार येथेच घेण्यात येत आहे. काबरा महाविद्यालयात बैठक व्यवस्थेचा गोंधळ पाहून परीक्षा मंडळाचे एक पथक येथे दाखल झाले आहे.
ऐनवेळी जास्त विद्यार्थी आले
महाविद्यालयाची क्षमता विद्यापीठाला कळविण्यात आली आहे. मात्र, आज सकाळी पहिल्या पेपरला ऐनवेळी अतिरिक्त विद्यार्थी केंद्रावर आले. जवळपास २०० विद्यार्थी अतिरिक्त आहेत.
- डॉ. सतीश सुराणा, प्राचार्य
चौकशी करू
या केंद्रावर अतिरिक्त विद्यार्थी कसे आले याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक गणेश मंझा यांनी हा सर्व गोंधळ पाहून दिली.