ग्रामस्थांनी उधळली शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांची सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:23 PM2024-10-26T15:23:52+5:302024-10-26T15:24:58+5:30
वैजापूर तालुक्यातील दुणकी, दसकुली येथील घटना; आमदारांनी काढता पाय घेतला
वैजापूर : तालुक्यातील टुणकी व दसकुली या गावात जनसंवाद यात्रेनिमित्त प्रचारासाठी गेलेल्या आमदार रमेश बोरनारे यांची सभा ग्रामस्थांसह मराठा आंदोलकांनी उधळून लावली. ग्रामस्थांचा रोष पाहून बोरनारे यांनीही तेथून जाणे पसंत केले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेदरम्यान घडली.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आ. बोरनारे यांची शुक्रवारी टुणकी व दसकुली येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामस्थ व मराठा आंदोलनकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी बोरनारे यांचे समर्थक बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथ मगर, आनंद निकम, गोरख आहेर यांनी मराठा आंदोलकांचे नेतृत्व करणारे अजय साळुंके यांच्याशी वाद घातला. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण होऊन ग्रामस्थांनी सभा उधळून लावली. ग्रामस्थांचे आक्रमक रुप पाहून बोरनारे यांनी दोन्ही गावातून काढता पाय घेतला.
या कारणामुळे केला विरोध
मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्नावर आ. बोरनारे यांच्या कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात बोरनारे यांनी कोणतीही मदत केली नाही. तसेच मराठा आरक्षणासाठी खोटा राजीनामा दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला. टुणकी व दसकुलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी निधी दिल्याचे म्हटले; मात्र प्रत्यक्षात काम झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. परिणामी बोरनारे यांची सभा उधळण्यात आली.