‘लाल परी’ची चाके थांबली; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू
By संतोष हिरेमठ | Published: September 3, 2024 09:05 AM2024-09-03T09:05:43+5:302024-09-03T11:05:03+5:30
प्रवाशांची गैरसोय, बराच वेळ थांबून बस येत नसल्याने प्रवासी खाजगी वाहनाने जाण्यास प्राधान्य देत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनामुळे ‘लाल परी’ची चाके थांबली असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतन वाढ आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी ६ वाजेपासून प्रत्येक बसस्थानकात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा देत आंदोलन सुरू केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये २ हजार ५८३ एसटी कर्मचारी आहेत. मध्यवर्ती बस स्थानकातून सकाळपासून बस रवाना होणे थांबले आहे. प्रवासी बसस्थानकात बसून आहेत. बराच वेळ थांबून बस येत नसल्याने प्रवासी खाजगी वाहनाने जाण्यास प्राधान्य देत आहेत.
दिलेला शब्द पाळला नाही
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यासह विविध मागण्या केल्या आहेत. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे.
- बाबासाहेब साळुंके, विभागीय सचिव, एस. टी. कामगार संघटना