राज्यपालांच्या 'स्वाक्षरी'कडे साऱ्यांचे लक्ष; राज्यातील २२ महापालिकांचे प्रभाग आराखडे होणार रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:51 PM2022-03-10T12:51:48+5:302022-03-10T12:52:56+5:30
भविष्यात शासनाच्या देखरेखीखाली वॉर्ड, प्रभागरचना तयार होईल. या निर्णयालाही काही नागरिक आव्हान देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉर्ड आणि प्रभाग आराखडा तयार करण्याचा अधिकार आपल्याकडे घेतला. या निर्णयावर राज्यपालांची स्वाक्षरी कधी होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निर्णयाचा प्रभाव राज्यातील २२ महापालिकांवर थेट पडणार आहे. ज्या महापालिकांनी आराखडे तयार करून निवडणूक आयोगाकडे सादर केले, ते तयार होत असलेले रद्द होणार आहेत.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका कळीचा मुद्दा बनला आहे. राज्य शासनाने निवडणुकीची गुंतागुंत प्रचंड वाढवून ठेवली आहे. अगोदर महापालिकांमधील वॉर्ड पद्धत रद्द करून तीन सदस्यांची प्रभाग पद्धत अमलात आणण्यासाठी कायद्यात तरतूद केली. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपत असलेल्या आणि संपलेल्या महापालिकांमध्ये प्रभागरचना तयार करण्याचे काम केले. २२ प्रमुख महापालिकांमधील प्रभाग पद्धतीवर कामही सुरू करण्यात आले. बहुतांश महापालिकांनी आराखडे तयार करून आयोगाला सादरही केले. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने विकास गवळी यांच्या याचिकेत निवडणुका वेळेवर घेण्याचे आदेश दिले.
ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्यास सत्ताधारी, विरोधक तयार नाहीत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याचे असलेले अधिकार काढून घेण्यात आले. त्यासोबतच आयोगाला वॉर्ड रचना आणि प्रभागरचना तयार करण्याचे असलेले अधिकारही शासनाने काढून घेतले. या निर्णयावर राज्यपालांनी सही केलेली नाही. निवडणूक याचिकांचे काम पाहणाऱ्या विधिज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आयोगाने मागील सहा महिन्यांत तयार केलेले आराखडे, ज्या महापालिकांनी आयोगाकडे सादर केलेले आराखडे आपोआप शासननिर्णयामुळे रद्द होणार आहेत. भविष्यात शासनाच्या देखरेखीखाली वॉर्ड, प्रभागरचना तयार होईल. या निर्णयालाही काही नागरिक आव्हान देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
या आहेत २२ महापालिका:
मनपा- वॉर्ड- प्रभाग
औरंगाबाद - १२६-४२
नवी मुंबई- १२२-४१
वसई-विरार- १२६- ४२
कोल्हापूर- ९२-३१
कल्याण डोंबिवली-१३३-४४
ठाणे- १४२-४७
उल्हासनगर-८९-३०
नाशिक- १३३-४४
पुणे- १७३-५८
पिंपरी चिंचवड-१३९-४६
सोलापूर-११३- ३८
अकोला-९१-३०
अमरावती-९८-३३
नागपूर- १५६-५२
चंद्रपूर-७७-२६
लातूर-८१-२७
परभणी- ७६-२५
भिवंडी-निजामपूर-१०१-३४
मालेगाव-९५-३२
मीरा-भाईंदर-१०६-३५
नांदेड-वाघाळा-९२-३०