प्रेमविवाहात पतीचा त्रास वाढला; फेसबुकवरील मित्राच्या मदतीने पत्नीने काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 12:02 PM2022-10-31T12:02:29+5:302022-10-31T12:03:36+5:30
१८ ऑक्टोबर रोजीच मारले, २७ रोजी सापडला मृतदेह, त्यानंतर गुन्हे शाखेने केला खुनाचा उलगडा
औरंगाबाद : बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पत्नीने मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेने कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपी पत्नीसह मित्राला शोधत खुनाचा उलगडा केला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला.
विजय संजयकुमार पाटणी (रा. वडगाव, कोल्हाटी) असे मृताचे नाव आहे. आरोपींमध्ये मृताची पत्नी सारिका विजय पाटणी (३२) व सागर मधुकर सावळे (२५, रा. ११वी योजना, शिवाजीनगर चौक) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; वाल्मी परिसरातील सोलापूर - धुळे महामार्गालगत २७ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी व्यक्तिचा मृतदेह सापडला होता. त्या व्यक्तिचा खून झाल्याचे २९ ऑक्टोबर रोजी शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. शहर पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्यासह आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान होते. २९ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, साताराच्या निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमाेल म्हस्के, कल्याण शेळके, गजानन सोनटक्के, संभाजी गोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली.
मृतदेह कुजलेला असल्यामुळे शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाण्यात बेपत्ता व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात एमआयडीसी वाळूज ठाण्यात २२ ऑक्टोबर रोजी सारिका हिने पती विजय हे १८ ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकांनी मृताची ओळख पटवली. त्यानंतर आराेपी पत्नी सारिका आणि तिचा मित्र सागर यांची चौकशी केली असता, त्यांनी विजय याचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी निरीक्षक बागवडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संभाजी गोरे यांच्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा सातारा ठाण्यात नोंदवला.
पती त्रास देत असल्यामुळे संपविले
सारिका व विजयचा १० एप्रिल २०१० रोजी प्रेमविवाह झाला होता. या दोघांना नऊ वर्षांची एक मुलगीही आहे. मात्र, काही वर्षांपासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. त्यामुळे दोघे एकत्र राहत नव्हते. सारिका बेपत्ता झाल्याची तक्रार विजय याने बेगमपुरा व एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंदविली होती. याच काळात सारिकाची मैत्री सागरसोबत झाली. तेव्हापासून ती आईकडेच राहत होती. काही दिवसांपासून विजय हा पत्नीकडे सतत दारू पिऊन येत त्रास देत होता. त्याच्या त्रासाला सारिका कंटाळली होती. तिने पतीला संपविण्याचा निर्णय घेतला.
वाल्मी परिसरात प्रेमाने नेले
सारिकाने पतीचा काटा काढण्याची तयारी केली होती. त्यासाठी तिने १८ ऑक्टोबरच्या रात्री पती विजय यास वाल्मी परिसरातील सोलापूर-धुळे महामार्गालगत गोड बोलून नेले. त्यांच्या पाठोपाठ तिचा मित्र सागरही आला. पती-पत्नी बसलेले असतानाच सारिकाने पतीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. सागरही मदतीला होताच. दोघांनी मिळून विजय यास संपविल्यानंतर मृतदेह झुडपात टाकून पोबारा केला. २२ ऑक्टोबरला पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून सारिका परभणी जिल्ह्यात नातेवाइकांकडे निघून गेली.