पतीने टिकली लावण्याचा हट्ट धरल्याने पत्नी आत्महत्येसाठी पोहचली रेल्वेस्थानकात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 02:38 PM2022-04-16T14:38:11+5:302022-04-16T14:40:01+5:30
प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याची कहाणी; दामिनी पथकाची मदत मिळाल्याने अनर्थ टळला
औरंगाबाद : टिकली लावण्याच्या आग्रहातून प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीत वादावादी झाली. दररोज तेल, साबण, शेंगदाणेसह इतर वस्तू संपल्यावर भांडण होत असे. अखेर कंटाळलेल्या पत्नीने आत्महत्या करण्यासाठी थेट रेल्वेस्थानक गाठले. त्याठिकाणी गेल्यावर दोन वर्षांच्या मुलीचे काय करावे, हा प्रश्न पडल्यानंतर ११२ नंबरला फोन करीत पोलिसांची मदत मागितली. दामिनी पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचत आत्महत्या करण्यास निघालेल्या महिलेचे मन वळविले व पती-पत्नींमध्ये समेट घडवून आणल्याची घटना शुक्रवारी घडली.
शहरातील एक युवक हैदराबाद येथे असतानाच त्याचे साऊथ इंडियन मुलीसोबत प्रेमसूत जुळले. मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी हे संबंध तत्काळ स्वीकारत दोघांच्या लग्नास होकार दिला. मात्र, मुलाच्या कुटुंबातील सदस्यांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे दोघांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर या दाम्पत्यास एक मुलगी झाली. पती हा खासगी दवाखान्यात नोकरी करतो. पत्नी गुड फ्रायडेच्या निमित्ताने शुक्रवारी चर्चमध्ये जाण्यास निघाली होती. तेव्हा पतीने कपाळावर टिकली लावण्याचा आग्रह धरला. तेव्हा पत्नीने चर्चमधून आल्यानंतर टिकली लावते, असे पतीला सांगितले. त्यावरून दोघात टोकाचे भांडण झाले. त्याशिवाय या दाम्पत्यात दररोज किरणा संपल्यावरून वाद होत होते.
पती सतत तेल संपले, साबण संपली, शेंगदाणे संपले की, पत्नीसोबत भांडण करीत होता. या वादाला कंटाळून पत्नीने दोन वर्षांच्या मुलीला सोबत घेत आत्महत्या करण्यासाठी रेल्वेस्थानक गाठले. रेल्वेस्थानकावर पोहचताच मुलीचे काय करावे, असा प्रश्न तिला पडला. तेव्हा महिलेने ११२ नंबरवर फोन करीत पोलिसांची मदत मागितली. नियंत्रण कक्षातून दामिनी पथकाला अलर्ट मिळाल्यानंतर पथकप्रमुख सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या मार्गदर्शनात लता जाधव, मनीषा बनसोडे, आशा गायकवाड आणि निर्मला निंभोरे यांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्या महिलेचे मनपरिवर्तन केल्यानंतर पतीला बोलावून दोघांत समझोता केला व मायलेकीला त्याच्या हवाली केले.
दोघांचा एकमेकांवर जीव
दामिनी पथकाने गाडीत बसवून मायलेकींना रेल्वे स्थानकातून बाहेर आणले. त्यानंतर पतीला बोलावून घेतले. दोघांमध्ये समेट घडवला. किरकोळ कारणातून एवढ्या टोकाचे पाऊल उचलणे चुकीचे असल्याचे समजावून सांगितले. यावर दोघांनीही एकमेकांवर जीव असल्याचे स्पष्ट करीत मतभेद मिटवून आनंदाने तिघे घरी निघून गेले.