महिलेचा वाकलेला पाय गुडघ्याखालील हाड कापून केला सरळ; सांधेरोपण, मोठी शस्त्रक्रिया टळली
By संतोष हिरेमठ | Published: December 22, 2023 07:07 PM2023-12-22T19:07:24+5:302023-12-22T19:07:48+5:30
विशेष म्हणजे मोठी चिरफाड टाळत केवळ गुडघ्याखालील पायाचे हाड कापून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : वय ३५ वर्षे, उंची ५ फूट २ इंच, वजन ७० किलो अशा सर्वसामान्य परिस्थितीतही एका महिलेचा पायच वाकला होता, ही व्याधी काही जन्मजातही नव्हती, तरी तिचे चालणेच बंद झाले. अशा वेळी घाटीतील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करून महिलेचा पाय सरळ केला. विशेष म्हणजे मोठी चिरफाड टाळत केवळ गुडघ्याखालील पायाचे हाड कापून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
घाटीतील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागात दहा दिवसांपूर्वी ही महिला दाखल झाली. गेल्या दोन वर्षांत महिलेचा उजव्या पायाचा गुडघा आणि टाचेदरम्यान भाग वाकला. पायाला मोठ्या प्रमाणात सूजही आली. त्यामुळे महिलेला चालणेही कठीण होऊ लागले. त्यामुळे दैनंदिन काम करणे अवघड होत होते. अशा परिस्थितीत त्या घाटीत दाखल झाल्या. अशा अवस्थेतील महिलेच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डाॅक्टरांनी घेतला आणि शस्त्रक्रिया यशस्वीही केली. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. अनिल धुळे यांनी ही शस्त्रक्रिया केली. डाॅ. मशुदुल, डाॅ. ऋषिकेश जाधव, डाॅ. मुकुंद परचुंडीकर, ओटी इन्चार्ज सिस्टर सिंधू निकम, सुरेखा चंद्रशेखर, उषा पवार, भाग्यश्री शिंदे आदींनी सहकार्य केले.
कशी केली शस्त्रक्रिया?
शस्त्रक्रिया करून गुडघ्याखालील हाडाला कापण्यात आले. रिंग आणि राॅडच्या मदतीने हाडाला ‘प्रेशर’ देण्यात आले. कापण्यात आलेल्या हाडाचे भाग भरण्यास आणि हाड पूर्णपणे मजबूत होण्यास मदत होते. अशा पद्धतीने शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच महिला वेदनामुक्त झाली.
अतिवजनाचा परिणाम
डाॅ. अनिल धुळे म्हणाले, महिलेचा पाय वाकला गेला होता. स्थिती अशीच राहिली तर त्या महिलेवर सांधेरोपणाची वेळ ओढावली असती. सांधेरोपणासाठी किमान एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो; परंतु सांधेरोपण टळले आहे.