'काळ आला होता, पण..; सीटबेल्टमुळे वाचले महिलेचे प्राण, बसला धडकताच उघडली एअर बॅग
By सुमित डोळे | Published: November 23, 2023 12:33 PM2023-11-23T12:33:23+5:302023-11-23T12:35:12+5:30
क्रांती चौकात सकाळी सिग्नल सुरू न झाल्याने कार, सिटी बसचा अपघात
छत्रपती संभाजीनगर : क्रांती चौकात सकाळी नऊ वाजेपर्यंत सिग्नल सुरू न झाल्याने सिटी बस व कारची धडक होऊन अपघात झाला. धडक जोरात होती. मात्र, कारचालक महिलेने सीटबेल्ट लावलेला असल्याने तत्काळ एअर बॅग उघडल्याने तिचा जीव वाचला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात घडला.
अल्पना सोमाणी या बुधवारी सकाळी त्यांच्या कारने मुलीला नाथ व्हॅली शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. तिला सोडून पुन्हा उस्मानपुरा मार्गे परतत असताना त्यांनी क्रांती चौकातून वळण घेतले. त्याच सुमारास बाबा पेट्रोलपंपाकडून आलेली बस व कारची बसच्या पुढील बाजूला धडकली. अपघाताने घाबरलेल्या अल्पना यांना स्थानिकांनी धाव घेत तत्काळ रुग्णालयात नेले.
म्हणून सीटबेल्ट आवश्यक
अल्पना यांची कार बसला धडकल्यानंतर काहीशी वर उडाली. यात कारचा समोरील बाजूने चुराडा झाला. परंतु अल्पना यांनी सीटबेल्ट लावलेला असल्याने एअर बॅग उघडल्याने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. सोमाणी कुटुंबाने देखील अल्पना यांचा जीव वाचणे महत्त्वाचे असल्याचे सांगून कोणाही विरोधात तक्रार नसल्याचे सांगितले.
सिग्नल सुरू होईपर्यंत वाहने सुसाट
शहरातील बहुतांश सिग्नल सकाळी ९ वाजता सुरू होतात. परंतु क्रांती चौक, भगवान महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप), सेव्हन हिल मध्ये सकाळी ८ वाजेपासून रहदारी सुरू होते.परंतु सिग्नल सुरू नसल्याने वाहने सुसाट जातात. अनेकदा वाहनचालक गोंधळून जातात. त्यामुळे महत्त्वाच्या चौकातील सिग्नल लवकर सुरू करावेत, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.