उपाहासात्मक रक्षाबंधन; ‘उमेद'च्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पाठविणार ट्रकभर राख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 07:31 PM2024-08-10T19:31:51+5:302024-08-10T19:33:52+5:30
‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न या संघटनेचे उपस्थित केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत (उमेद) कार्यरत महिला कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्ह्यातून दीड लाख, तर राज्यभरातून जवळपास १ कोटी राख्या पाठविल्या जाणार आहेत. हे वाचून मुख्यमंत्र्यांप्रती महिला कर्मचाऱ्यांचे किती प्रेम, असेच वाटले असेल ना. पण, हे प्रेम-बीम काही नाही. हा आंदोलनाचाच एक भाग आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) आस्थापनेस नियमित विभाग म्हणून मान्यता द्यावी, या अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी, अधिकारी आणि समुदाय संसाधन व्यक्तींना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी ‘उमेद’ महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने ८ जुलै रोजी आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. उमेद अभियानाने आतापर्यंत ८० लाख महिलांना एकत्रित केले असून ४ कोटींपेक्षा जास्त व्यक्ती या अभियानाच्या माध्यमातून जोडल्या आहेत. ७ लाख स्वयंसहायता समूह, ३१ हजार ग्रामसंघ, तर २ हजार प्रभागसंघ तयार झाले आहेत. एवढी मोठी संस्था बांधणीचे काम या अभियानाने केले आहे. तरीही या अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
८ जुलै रोजी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कळविले होते की, अन्य विभागांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कोणते धोरण अवलंबिले आहे किंवा अन्य राज्यात अशा कर्मचाऱ्यांसंबंधी कोणता निर्णय घेतला आहे, याचा अभ्यास करून निर्णय घेऊ. मात्र, अद्यापही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संघटनेच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे लक्ष वेधण्यासाठी रक्षाबंधन या दिवशी त्यांना राख्या पाठविण्यात येणार आहे, असे संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष वंदना जोगदंड व कर्मचारी जिल्हाध्यक्ष सचिन सोनवणे यांनी कळविले आहे.
ट्रकने पाठविणार राख्या
एकीकडे मुख्यमंत्री महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवीत आहेत. यात लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे मोफत शिक्षण, याशिवाय शासनाने २५ लाख महिलांना लखपतीदीदी बनविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल १५ हजारांवरून ३० हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना मोफत ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास. मग, ‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न या संघटनेचे उपस्थित केला आहे. त्यामुळे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातून ट्रकभर राख्या पाठविल्या जाणार आहेत.