छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक यांचा पुतळा स्थलांतरित करण्याचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:31 IST2024-08-29T18:30:50+5:302024-08-29T18:31:49+5:30
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने घेतला निर्णय

छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक यांचा पुतळा स्थलांतरित करण्याचे काम सुरू
छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानकाजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या खाली माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी वाहतुकीची बरीच कोंडी होत असल्याने पुतळा अक्षयदीप प्लाझा, व्यापारी संकुलाशेजारी हरितपट्ट्यात स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारपासून महापालिकेने कामाला सुरुवात केली. दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.
वसंतराव नाईक चौकातून ये-जा करताना वाहनधारकांना बराच त्रास सहन करावा लागतो. बाहेरगावहून आलेल्या वाहनधारकांना उड्डाणपुलाखालून रस्ताच दिसत नाही. सिग्नल संपल्यानंतर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा वाहनासमोर येतो. त्यामुळे पुतळा स्थलांतरित करण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. सर्वसहमतीने हा पुतळा जळगाव रोडवरील हरितपट्ट्यात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. सुरुवातीला धीरज देशमुख यांनी या पुतळ्याचे डिझाइन तयार केले. १ कोटी २२ लाख रुपये खर्च करून पुतळ्याचे काम केले जाणार आहे. काही अडचणींमुळे प्रकल्प सल्लागार समिती बदलण्यात आली, असे कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी सांगितले. या कामाची मुदत ऑगस्ट २०२४ पर्यंत होती; पण या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या हायटेन्शन लाइन शिफ्ट करण्यास वेळ गेला; त्यामुळे दोन महिने विलंबाने काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आठवडाभरात पुतळा शिफ्ट करणार
सध्या असलेला पुतळा रंगरंगोटीसाठी आठवडाभरात काढला जाणार आहे. रंगरंगोटीनंतर नवीन ठिकाणी हा पुतळा बसविला जाईल. सध्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे, असे वॉर्ड अभियंता मधुकर चौधरी यांनी सांगितले.