सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे विद्यापीठातील नामांतर स्मारकाचे काम रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 19:49 IST2025-01-02T19:49:08+5:302025-01-02T19:49:38+5:30

विद्यापीठ प्रशासनाचा गंभीर आरोप : वक्फ न्यायालयाच्या आदेशामुळे कामाला स्थगिती

The work on the Namantar memorial was stalled due to the inaction of the Public Works Department. | सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे विद्यापीठातील नामांतर स्मारकाचे काम रखडले

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे विद्यापीठातील नामांतर स्मारकाचे काम रखडले

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नियोजित नामांतर शहीद स्मारकाचे काम सा. बां. विभागाचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या अनिच्छा व नाकर्तेपणामुळे रखडल्याचा गंभीर आरोप विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. तसेच, वक्फ न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करीत ‘नामांतर शहीद स्मारक’ उभारणीचे काम न्यायालयाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत थांबविल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परिसरातील सिटी सर्व्हे क्रमांक १०७३ वर नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी सुरू केले आहे. बांधकामाची मुदत ९ महिन्यांची होती. त्यासाठी प्रशासनाने वारंवार संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रे, स्मरणपत्रे व कायदेशीर नोटीस बजावून सदर काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी बजावले होते. मात्र, बांधकाम पूर्णत्वाकडे गेलेले नसल्याचा फायदा घेत सय्यद जियाउद्दीन कादरी याने ही जागा वक्फची असून, सर्व्हे क्रमांक १०७३ वर हे बांधकाम सुरू नसून, सर्व्हे क्रमांक ३९४ या वक्फ मिळकतीवर सुरू असल्याचा दावा केला.

हा दावा दाखल केल्यानंतरही २ वर्षे या प्रकरणात न्यायाधिकरणाने कोणतेही स्थगिती आदेश दिले नव्हते. मात्र, बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे काम पूर्णत्वास गेले नाही आणि त्याचा फायदा तक्रारदार सय्यद जियाउद्दीन कादरी याने घेत न्यायालयास तात्पुरता मनाई हुकूम जारी करून बांधकाम थांबविण्याची विनंती केली. त्यास विद्यापीठ प्रशासनानेही तात्पुरत्या मनाई हुकमाचा अर्ज फेटाळून लावण्याची विनंती केली आहे. त्यात विद्यापीठाच्या विधिज्ञांची सुनावणी पूर्ण झाली असून, तक्रारदाराच्या वकिलांची सुनावणी बाकी आहे. न्यायाधिकरणाने दिलेले मनाई आदेश तात्पुरत्या स्वरूपातील आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने न्यायाधिकरणाच्या आदेशाचा सन्मान करीत बांधकाम थांबविण्याचा निर्णय घेतला असल्याचेही कुलसचिव डॉ. अमृतकर यांनी स्पष्ट केले आहे.

काम सुरू केल्याचा भाजपचा दावा
विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे काम थांबविण्याची माहिती मिळाल्यानंतर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कंत्राटदारास काम सुरू करण्यास भाग पाडल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस जालिंदर शेंडगे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष लक्ष्मण शिंदे, बबन नरवडे, विजया भोसले, रेणा दांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The work on the Namantar memorial was stalled due to the inaction of the Public Works Department.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.