वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगारांना आरोग्यासाठी शहरात जाण्याचे खेटे टळले

By साहेबराव हिवराळे | Published: November 30, 2023 06:34 PM2023-11-30T18:34:07+5:302023-11-30T18:34:40+5:30

वाळूज औद्योगिक क्षेत्रात दीड लाखाच्या पुढे कामगारांची नोंद; नवीन हॉस्पिटल प्रस्तावित

The workers of Waluj MIDC area avoided going to the city for health | वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगारांना आरोग्यासाठी शहरात जाण्याचे खेटे टळले

वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगारांना आरोग्यासाठी शहरात जाण्याचे खेटे टळले

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात कामगार कुटुंबीयांच्या आरोग्यसेवेची होत असलेली हेळसांड थांबली असून, गंभीर आजाराला आता पाच सुपर स्पेशालिटी व साधे रुग्णालय संलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य सुविधांअभावी कामगारांच्या होणाऱ्या त्रासदायक फेऱ्या आता टळल्या आहेत.

कामगार विमा योजना ही कामगारासाठी आरोग्यसेवा देणारी भक्कम सुविधा शासनाने निर्माण करून दिलेली आहे. एकवीस हजारांच्या खाली पगार असलेल्या प्रत्येक कामगारांची राज्य कामगार विमा योजनेच्या सेवेमध्ये सहभागी करण्याची प्रत्येक व्यवस्थापनाला ताकीद दिलेली आहे; परंतु बहुतांश कारखान्यातील खासगी गुत्तेदार हंगामी कामगारांच्या नोंदी रेकॉर्डवर घेत नाहीत. परिणामी आजाराप्रसंगी अशा कामगारांना घाटी किंवा खासगी दवाखान्याचे दार ठोठावल्याशिवाय पर्याय राहत नाही.

वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे मजूर, सहकारी संस्था, विविध गृहनिर्माण सोसायटी तयार करून एमआयडीसीजवळ असलेल्या पंढरपूर, बजाजनगर, रांजणगाव, वडगाव, साजापूर, करोडी, वाळूज, तिसगाव, गोलवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. दहा वर्षांपूर्वी एका भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत राज्य कामगार विमा योजनेचा बाह्यरुग्ण विभाग शहरात सुरू करण्यात आला होता. येथे औषध व वैद्यकीय सल्ल्यासाठी जावे लागत होते. आता काॅर्पोरेशनच्या वतीने नवीन दवाखाना देखील प्रस्तावित आहे.

दवाखाना झाल्याने टळली गैरसोय
एमआयडीसी वाळूज परिसरामध्ये कामगार विमा योजनेने दवाखाना सुरू केला आहे. त्यामुळे कामगारांची आरोग्यसेवेसाठी होणारी गैरसोय टळली आहे. सेवासुविधांमध्ये राज्य शासनाने अधिक बळकटी द्यावी, जेणेकरून खासगी दवाखान्यात जाणाऱ्या पैसा कामगारांच्या पैशांची बचत होईल.
- कामगार नेता विठ्ठल कांबळे

अतिगंभीरप्रसंगी आजाराची प्रक्रिया तीव्रतेने व्हावी
कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना राज्य कामगार विमा योजनेच्या दवाखान्यातून मिळणाऱ्या आरोग्यसेवेचा लाभ कामगार कुटुंबे व कामगार घेतात. सुपर स्पेशालिटी आणि साध्या सेवा उपलब्ध केल्या असल्या तरी येथे पॅथॉलॉजीसाठी खासगी ठिकाणी जावे लागते किंवा शहरात राज्य कामगार दिनाच्या दवाखान्यात फेरी मारावी लागते. या गैरसोयी टाळण्यासाठी पॅथॉलॉजीची सेवादेखील वाळूज परिसरातच करून द्यावी. गंभीर आजाराप्रसंगीच्या कागदपत्राची पूर्तता आणि निधी तत्काळ दवाखान्याला उपलब्ध करून द्यावा व त्यातून कामगारांच्या उपचारांमध्ये दिरंगाई टाळावी.
- प्रकाश जाधव, कामगार नेते

कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या वाढवावी
पंढरपूर, रांजणगाव एमआयडीसीत दररोजच्या बाह्यरुग्ण सेवेमध्ये रुग्णाची संख्या पाहता, बदली झालेले डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी संख्या अपूर्ण असल्यामुळे रांगा कमी होत नाही. परिणामी कार्पोरेशन कर्मचारी डॉक्टर संख्या वाढवण्याची गरज आहे, असे मत कामगारांनी व्यक्त केले.

दररोज अडीचशे ते तीनशे बाह्यरुग्ण
एमआयडीसी वाळूज परिसरात दीड लाखांच्या जवळपास कामगारांची नोंद आहे. त्यामुळे पंढरपूर तिरंगा चौक, एक बसस्थानक परिसर, रांजणगाव परिसरात अशा तीन ठिकाणी बाह्यरुग्ण सेवा दिली जाते. कामगारांच्या ट्रिटमेंटच्या नोंदी ऑनलाइन झाल्यामुळे रुग्णांच्या पूर्वी होत असलेल्या अडचणीवर मात केली आहे. कार्पोरेशनच्या प्रशस्त इमारतीमध्ये कामगारांच्या आरोग्यसेवेत वाढ केली आहे.
- डॉ. स्वामी

Web Title: The workers of Waluj MIDC area avoided going to the city for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.