‘माझ्यामुळे कुणाला तकलीफ नको’ म्हणत तरुणाने संपविले जीवन; औरंगाबादमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 07:36 AM2022-03-18T07:36:15+5:302022-03-18T07:36:25+5:30
पिशोर : ‘माझ्यामुळे कुणालाही तकलीफ नको,’ असे म्हणत विषारी औषध सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल करून तरुणाने जीवनयात्रा संपविली. ही ...
पिशोर : ‘माझ्यामुळे कुणालाही तकलीफ नको,’ असे म्हणत विषारी औषध सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल करून तरुणाने जीवनयात्रा संपविली. ही घटना पिशोर येथे बुधवारी रात्री उघडकीस आली. सुनील दत्तू ढगे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाने नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुनील ढगे या तरुणाने समाजमाध्यमावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ टाकला. या व्हिडिओत सुनील म्हणाला की, ‘माझ्यामुळे कुणालाही तकलीफ होता कामा नये, मी औषध घेतोय. त्यामुळे भाऊ, भावजय यांना तकलीफ व्हायला नको.’ त्यानंतर दोन वेगवेगळ्या बॉटलमधून एका पारदर्शक ग्लासमध्ये विषारी औषध ओतून त्याने ते प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल होताच ओळखीच्या नागरिकांनी व नातेवाइकांनी तत्काळ अंजना-पळशी मध्यम प्रकल्पाच्या जवळील गट क्रमांक ५३० मध्ये जाऊन घटनास्थळ गाठले. अत्यावस्थेत पडलेल्या सुनीलला पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. प्रकृती गंभीर होत असल्याने प्रथमोपचार करून त्याला घाटी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. औरंगाबादकडे घेऊन जात सुनीलची प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यामुळे नातेवाइकांनी फुलंब्रीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
गुरूवारी सकाळी झाले अंत्यसंस्कार
फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सकाळी पिशोरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सुनीलच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सपोनि. कोमल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार किरण गंडे पुढील तपास करीत आहेत.