अंगावर गाडी, नंतर फरफटत नेले; वकिलाच्या कृत्याची घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 02:13 PM2023-02-08T14:13:03+5:302023-02-08T14:14:08+5:30
अंगावर गाडी घातल्यामुळे फिर्यादी योगेश अहिरे (रा. महूनगर) हे जखमी झाले. वकील किरण राजपूत (कुदळे) व त्यांचे सोबती गणेश साेनवणे यांच्यासह आणखी एकाचा आरोपींमध्ये समावेश आहे.
औरंगाबाद : किरकोळ वादातून एका वकिलाने भरधाव चारचाकी मजुराच्या अंगावर घातली. त्यानंतर खाली उतरून त्यास मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या पाच नातेवाइकांच्याही अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तसेच एकास काही अंतर फरफटत नेल्याचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. या प्रकरणात मजुराच्या तक्रारीवरून वकिलासह इतर तीन जणांच्या विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अंगावर गाडी घातल्यामुळे फिर्यादी योगेश अहिरे (रा. महूनगर) हे जखमी झाले. वकील किरण राजपूत (कुदळे) व त्यांचे सोबती गणेश साेनवणे यांच्यासह आणखी एकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार बीड बायपासवरील ५० ग्रीन्स सोसायटीजवळ रविवारी दुपारी आरोपी किरण राजपूतने किरकोळ वादातून योगेश अहिरे यांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याचा जाब विचारताच राजपूत याने गाडी सुरू करीत पाच लोकांचा विचार न करता वेगात गाडी मागेपुढे केली. यात एकजण पाठीमागच्या दरवाजाजवळ होता. त्यास काही अंतर फरफटत नेल्याचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला.
पोलिसांनी गणेश सोनवणे यास अटक केली, तर किरण राजपूत याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे अटक केलेली नाही. दरम्यान, राजपूत याच्या कुटुंबीयांनीही सातारा पोलिस निरीक्षकांसह आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त बालाजी सोनटक्के यांची भेट घेत महूनगर येथील मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.
प्रकरणाचा गुंता वाढला
अंगावर गाडी घालणाऱ्या वकिलाने आपल्याला महूनगरच्या जमावाने मारहाण करीत चाकूने भोसकल्याचा दावा केला, तर महूनगरच्या एका गरोदर महिलेने वकिलाने जातीवाचक शिवीगाळ करीत पोटावर लाथ मारल्याचा दावा करीत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. त्याशिवाय वकिलासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी कोणतीही आपत्ती नसताना ११२ नंबरवर १५ वेळा फोन करून पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.