तरुणाची हत्या करून म़ृतदेह साई टेकडी परिसरात फेकला
By सुमित डोळे | Updated: December 16, 2023 19:31 IST2023-12-16T19:31:00+5:302023-12-16T19:31:18+5:30
दोन दिवसांपुर्वी महिलेची तरुणाविरोधात तक्रार, लिव्ह इन रिलेशनशिपच्या प्रकरणातून खुनाचा संशय

तरुणाची हत्या करून म़ृतदेह साई टेकडी परिसरात फेकला
छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुऱ्यातील कबीरनगरमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय आनंद साहेबराव वाहुळ (२७) याची अज्ञातांनी क्रूर हत्या केली. हत्या करून मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह साई टेकडी परिसरात फेकून दिला. गुरुवारी सायंकाळी स्थानिकांना हा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. दरम्यान, आनंद काही वर्षे एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्या प्रकरणातूनच ही हत्या झाल्याचा दाट संशय पोलिसांना असून शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू झाला होता.
रिक्षाचालक असलेला आनंद काही दिवसांपूर्वीच कामाच्या शोधात मुंबईला गेला होता. आठवड्यापूर्वी तो शहरात परतला. चार वर्षे लिव्ह इनमध्ये राहिलेल्या महिलेला तो भेटायला गेला. मात्र, महिलेने त्याच्याशी पुन्हा संपर्क ठेवण्यास नकार दिला. आनंद मात्र ऐकायला तयार नव्हता. महिलेने १३ डिसेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात जात त्याच्या विरोधात तक्रार दिली. घरी बळजबरीने येणे, धिंगाणा घालत असल्याचे आरोप महिलेने केले. त्यावरून त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतर आनंद घरी परतलाच नाही. इतरत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने त्याच्या वडिलांनीदेखील त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली.
संशय महिलेवरच
महिलेने तक्रार दिल्यानंतरच आनंद बेपत्ता झाल्याने त्याच्या हत्येच्या संशयाची सुई आनंद लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेकडेच अधिक आहे. आनंद पुन्हा घरी आल्याचे कळाल्यानंतर महिलेच्या मुलाने त्याला घरात कोंडले. अन्य दोघांंच्या मदतीने तो बेशुद्ध पडेपर्यंत त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर वाहनातून साई टेकडी परिसरात फेकून दिले. गुरुवारी फिरायला गेलेल्या नागरिकांना त्याचा मृतदेह आढळून आला. चिकलठाणा पोलिसांनी आसपासच्या ठाण्यांमध्ये बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासल्यावर त्याची ओळख पटली.
रात्री गुन्ह्याची प्रक्रिया सुरू
शुक्रवारी रात्री उशिरा एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर पोलिसांनी महिला, तिच्या मुलाचा शोध सुरू केला होता.