स्पोर्टस् बाईकवरून जाताना मान बाजूला केली, रिक्षाला आदळून तरुण जागीच ठार
By सुमित डोळे | Published: January 3, 2024 12:47 PM2024-01-03T12:47:55+5:302024-01-03T12:48:34+5:30
स्पोर्टस् बाईक चालक मित्र अपघातानंतर फरार झाला तर मागून येणारा मावस भाऊ आला धावून
छत्रपती संभाजीनगर : मित्रासोबत स्पोर्टस् बाईकवरून जात असताना थोडी मान वळवताच मागून सुसाट आलेल्या रिक्षाला आदळून योगिराज रणजित शिरसाट (वय १७) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजता सिडको उड्डाणपुलावर हा विचित्र अपघात घडला.
योगीराजचे कुटुंब भावसिंगपुऱ्यातील निसर्ग कॉलनीत राहते. योगीराज, त्याचा मित्र व मावस भाऊ असे तिघे सोमवारी सायंकाळी जालना रस्त्यावरून मुकुंदवाडीच्या दिशेने जात होते. योगीराज, त्याचा मित्र स्पोर्टस् दुचाकीवर, तर त्याचा मावस भाऊ स्वतंत्र दुचाकीवरून जात होता. सिडको उड्डाणपूल चढल्यानंतर काही अंतरावर मागे बसलेल्या योगीराजने पुढे पाहण्यासाठी मान बाजूला केली. तेवढ्यात त्यांच्या अगदी जवळून जाणाऱ्या मालवाहू रिक्षाला त्याचे डोके आदळले व तो तसाच जोरात जमिनीवर पडला.
दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने योगीराज त्याच वेगाने जमिनीवर आदळल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. स्पोर्टस् बाईक चालक मित्र मात्र निघून गेला. मावस भावाला हे दिसताच त्याने दुचाकी थांबवली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाला पाहून त्याने आक्रोश केला. अन्य वाहनचालकांनी धाव घेत त्याला धीर देत वडिलांना संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी धाव घेत रुग्णवाहिकेतून योगीराजचा मृ़तदेह घाटी रुग्णालयात पाठविला.