हल्ल्यात अन्ननलिका तुटलेल्या तरुणाचा सहा दिवसांनी झाला मृत्यू
By सुमित डोळे | Published: August 18, 2023 08:29 PM2023-08-18T20:29:31+5:302023-08-18T20:29:39+5:30
शिवीगाळ करून गळा, गुप्तांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण; पहिले किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याने उस्मानपुरा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
छत्रपती संभाजीनगर : किरकोळ कारणावरून रमानगरातील अजिंक्य राजेश ठोंबरे (२३) या तरुणाला सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. त्याच्या गळ्यावर फायटरने वार करत गुप्तांगावर लाथाबुक्क्यांचे ठोसे लगावले. १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी अजिंक्यचे घाटीत उपचार सुरू असताना गुरुवारी निधन झाले. अजिंक्यच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली असताना उस्मानपुरा पोलिसांनी मूळ गुन्ह्यात किरकोळ कलमे लावल्याने त्यांच्या भूमिकेवर नातेवाइकांनी प्रश्न उपस्थित केले. शनिवारी पोलिसांनी खुनाचे कलम वाढवत आरोपींना अटक करणे सुरू केले. तोपर्यंत आरोपी मोकाट फिरत होते.
अजिंक्य आई, वडील, दोन बहिणींसह रमानगरमध्ये राहत होता. काहीसा आजारी अजिंक्य त्याचे दैनंदिन काम करायचा. स्थानिक दुकाने, कार्यालयांमध्ये तो चहा देण्याचे काम करायचा. १२ ऑगस्ट रोजी रात्री अजिंक्य कामावरून घरी जाताना आराेपी चेतन कांबळे, बाळू कांबळे यांनी त्याला विनाकारण शिवीगाळ करून डिवचले. चिडलेल्या अजिंक्यनेही त्यांना प्रत्युत्तर दिले. जेवणानंतर तो आत्याकडे जात असताना चेतन, बाळूने त्याला पकडून पत्र्याच्या शेडजवळ नेले. तेथे आरोपीचे आई, आजी, बहीण, आजोबा व अन्य दोन मित्रांनी मिळून अजिंक्यला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अजिंक्यची गुरुवारी मृत्यूशी झुंज अखेर संपली. डॉक्टरांनी शवविच्छेदनात शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा असून, अवयवांना गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले.
शस्त्रक्रिया झाली; मारहाणीपासून अत्यावस्थच
मारहाणीत अजिंक्यच्या खासगी अवयव व अन्ननलिकेला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रियादेखील केली. मारहाण इतकी गंभीर हाेती की त्याचे संपूर्ण शरीर सुजले होते. मात्र, उस्मानपुरा पोलिसांनी किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतलेच नाही. गंभीर मारहाणीची घटना लपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोपही संतप्त नातेवाइकांनी केला.
खुनाचा उद्देश स्पष्ट मग केवळ भादवी ३२४ का ?
हल्लेखोरांच्या मारहाणीत अजिंक्य च्या खाजगी अवयवांसह अन्ननलिकेला गंभीर दुखापत होत्या. त्याला रस्त्यावर लाथाबुक्यांनी अक्षरक्ष: तुडवले. शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. हा नियोजित कटात त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. परंतू पोलिसांनी त्यांचा उद्देश स्पष्ट असतानाही भादवी ३२६, ३०७ टाळून किरकोळ ३२४ का दाखल केला, असा गंभीर प्रश्न आता उस्मानपुरा पोलिसांच्या भुमिकेवर उपस्थित होत आहे.